कोट्यावधी लोकांच्या जीवनावर आपला सकारात्मक आणि क्रांतीकारी प्रभाव टाकू इच्छितात हणमंत गायकवाड
२०२७ पर्यंत दहा लाख लोकांना रोजगार देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे भारत विकास समूहाच्या संस्थापकांनी. . . आजवर ६५ हजार जणांना नोकरी देणा-या हणमंत यांनी लहानपणी रेल्वे स्थानकावर आंबेसुध्दा विकले आहेत. . . . दारिद्रय इतके होते की सारे कुटूंब १०*१०च्या खोलीत राहण्यास विवश होते. आजारी वडीलांच्या उपचारासाठी आईला आपले मंगळसूत्र देखील गहाण ठेवावे लागले होते. . . . . पैसे वाचावे म्हणून हणमंत चाळीस किलोमोटर दररोज सायकलने अभियांत्रिकी महाविद्यालयात ये-जा करत होते. . .. त्याच काळात रंग-रंगोटीची कामे मिळवत कंत्राटदार उद्यमी बनले होते हणमंत. . . कुटूंबात सात पिढ्यात कुणीच व्यवसाय केला नव्हता, पण काहीतरी वेगळे, मोठे आणि नविन करायचे स्वप्न उराशी बाळगल्याने हणमंत झाले यशस्वी उद्योजक. . . स्वामी विवेकांनद आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनाच आपला आदर्श समजणारे हणमंत स्वत:ला व्यावसायिक नाहीतर समाजसेवक मानतात.
स्वामी विवेकानंदांनी सांगितले होते की, “ स्वतःवर विश्वास ठेवणारे १०० युवक मला द्या, मी भारताला जगातील सर्वात श्रेष्ठ राष्ट्र बनवेल”. भारत विकास ग्रुप चे संस्थापक आणि अध्यक्ष हणमंत रामदास गायकवाड स्वतःला सद्यकाळातील याच १०० युवकांपैकी एक मानतात.त्यांना कमालीचा आत्मविश्वास आहे. याच आत्मविश्वासाच्या बळावर त्यांनी देशभर त्यांच्या संस्थांचे जाळे विणले, ज्यात ६५,००० हून अधिक लोकांना रोजगार दिला आहे. १९९७मध्ये केवळ आठ कर्मचाऱ्यांपासून सुरु केलेल्या कंपनीला हणमंतराव यांनी इतके मोठे बनवले की त्यांची कंपनी आज देशातल्या वीस राज्यांमध्ये आपल्या सेवा प्रदान करत आहेत. कंपनीचे ७०० पेक्षा जास्त क्लायंट आहे आणि त्यांच्या ग्राहकांच्या यादीत देश-विदेशातील प्रसिद्ध कंपन्यांचा समावेश आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देणाऱ्या भारत विकास ग्रुपचा देशात सर्वात मोठा समूह आहे. आशिया खंडात आपत्कालीन आरोग्य सेवा पुरवणारी ही सर्वात मोठी कंपनी आहे. जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाच्या राज्यकारभाराचा गाडा जिथून हाकला जातो ते भारतीय लोकाशाहीचे मंदीर संसदभवन स्वच्छ सुंदर आणि नीटनेटके ठेवण्याची जबाबदारीही भारत विकास ग्रुपवर आहे इतकचे नाही लोकसभा, राज्यसभाच नव्हे राष्ट्रपती भवन आणि पंतप्रधान कार्यालयाची स्वच्छता देखील ही कंपनी पाहते. बीव्हीजीच्या साठ हजार कर्मचारी तंत्रज्ञांची फौज यासाठी अहोरात्र काम करते. अगदी तिसरी शिकलेल्या व्यक्ती पासून उच्चशिक्षित अधिका-यांपर्यत या चमूतील सदस्य काम करतात. इतकेच नाही तर १०० पेक्षा जास्त भारतीय रेल्वेच्या देखभालीचे काम, टाटा समूह, हिंदुस्थान लिव्हर, फोक्सवँगन सारख्या कार्पोरेट्सना देखील हे हाऊसकिपींग सेवा देतात.
हणमंतराव यांचे भविष्यातील उद्दिष्ट पाहून सहजपणे अंदाज येतो की त्यांना त्यांच्या क्षमतेवर, विचारांवर आणि योजनांवर प्रचंड विश्वास आहे. म्हणूनच ते गर्वाने आणि आत्मविश्वासाने सांगतात की, २०२७ पर्यंत त्यांच्या कंपनीत १० लाख कर्मचारी असतील. अर्थात १० लाख लोकांना ते रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देतील. त्यांचे स्वप्न फक्त २०२७ पर्यंतच मर्यादित नाही तर त्याहीपेक्षा पुढे मजल गाठत १० कोटी लोकांचे जीवनमान उंचवण्यास ते मदत करतील. त्यांचे स्वप्न आहे की, त्यांनी स्थापन केलेल्या विविध संस्थांच्या माध्यमातून लोकांना मदत करणे, त्यांच्या जीवनात सकारात्मकपणे सुख-शांती आणि प्रगतीच्या वाटा खुल्या करणे.
हणमंतराव यांचा आतापर्यंतचा प्रवास पाहता त्यांनी ठरवलेली उद्दिष्ट ते नक्कीच गाठतील यात शंका नाही. कारण कित्येकांना अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टी त्यांनी शक्य करून दाखवल्या आहे. शून्यातून शिखर गाठणारी त्यांची कथा आहे. पुण्यातल्या एका सामान्य घरात जन्मलेल्या हणमंतराव यांनी मोठी स्वप्न पाहिली, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्पनेतील स्वच्छ भारत मिशन ख-या अर्थाने ते राबवत आहे. शिवाय देशातील हजारो तरुणांना आदर्शवत ठरले आहे. परिस्थितीशी दोन हात करून केवळ मेहनत जिद्द् आणि प्रामाणिकपणाच्या बळावर त्यांनी इथवरचा पल्ला गाठला आहे. मराठी वाचकांना आपल्या या मराठमोळ्या माणसाच्या उद्यमशिलतेच्या कहाणी पासून नक्कीच प्रेरणा मिळेल आणि ऊर अभिमानाने भरून येईल. त्यांच्या या यशोगाथेत यशाचे अनेक मंत्र दडलेले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद हणमंतराव यांचे आदर्श आहे. एकीकडे ते स्वामी विवेकानंद यांचा अध्यात्म, धर्म आणि राष्ट्रनिर्माण यांचे विचार आचरणात आणून पुढे मार्गक्रमण करत आहे तर दुसरीकडे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पुढे ठेवत ‘महाराजा’ प्रमाणे काम करणे आणि जीवन जगणे यावर ते विश्वास ठेवतात.
या यशोगाथेचे नायक हणमंतराव गायकवाड यांचा जन्म महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्यातील कोरेगाव येथे झाला. सातारा जिल्ह्यातल्या रहिमतपूरच्या न्यायालयात त्यांचे वडील कारकून होते तर आई गृहिणी. हणमंत यांना लहानपणापासूनच अभ्यासात गती होती. गणितासारख्या विषयात त्यांना पैकीच्या पैकी गुण मिळत. त्यांचे अभ्यासातले प्राविण्य पाहून त्यांच्या पुढील चांगल्या शिक्षणासाठी त्यांच्या वडिलांनी साताऱ्यात स्थलांतर करायचे ठरवले. त्यांचा दाखला साताऱ्याच्या नवीन मराठी शाळेत करण्यात आला. हणमंत अभ्यासात इतके हुशार होते की चौथीत असतानाच राज्यसरकारची शिष्यवृत्ती मिळाली. शिष्यवृत्तीचे दरमहा त्यांना दहा रुपये मिळायचे. ही छोटीशी मिळणारी रक्कम त्यावेळी त्यांच्यासाठी खूप मोलाची होती. लहान वयात मिळालेल्या या शिष्यवृत्तीमुळे त्यांच्या मनावर खोलवर परिणाम झाला. त्यांच्या लक्षात आले की ही शिष्यवृत्ती त्यांच्या श्रीमंत मित्रांना नाही तर त्यांच्या सारख्या गरीब विद्यार्थ्याला मिळाली आहे, याचाच अर्थ त्यांच्या मित्रांच्या तुलनेत त्यांची बुद्धी अधिक तल्लख आहे. या शिष्यवृत्तीमुळे त्यांचा आत्मविश्वास बळावला. आणि त्यांना खात्री वाटली की ते वेगळे असे काहीतरी करतील ज्यामुळे त्यांना सामाजिक प्रतिष्ठा मिळेल.
शिष्यवृत्ती मिळण्यापूर्वीच हणमंत यांच्या मनावर त्यांच्या सभोवताली असलेल्या वातावरणाचा परिणाम झाला होता. त्यांच्या घरची परिस्थिती नाजूक होती. एकट्या वडिलांच्या पगारावरच त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह चालयचा. साताऱ्याच्या एका छोट्याश्या घरात हणमंत यांचे कुटुंब वास्तव्यास होते. १०/१२ च्या त्यांच्या घरात त्यावेळी वीज नव्हती. लहानग्या हणमंतला वाटायचे की, ज्या लोकांकडे वीज आहे ते लोक श्रीमंत आहेत आणि ज्यांच्याकडे नाही ते लोक गरीब. त्यांच्या वाढदिवशी सुद्धा ते गरीब असल्याची जाणीव त्यांना व्हायची. कारण सभोवताली असलेले त्यांचे श्रीमंत मित्र त्यांच्या वाढदिवशी चॉकलेटस वाटायचे, केक कापून वाढदिवस साजरे करायचे. परिस्थितीमुळे लहानग्या हणमंत यांच्या वाटेला हे सारे काही आले नाही. मात्र गरीब परिस्थितही त्यांचा जन्मदिन त्यांच्या घरच्या परिस्थितीनुसार साजरा केला जायचा. हणमंतराव त्यांच्या बालपणीच्या आठवणी सांगतात की, “ज्या दिवशी त्यांचा वाढदिवस असायचा त्यादिवशी त्यांच्या घरी गव्हाची पोळी तयार व्हायची आणि त्याबरोबर गोड पदार्थ म्हणून लिंबू आणि साखर मिश्रित सुधारस तयार केला जायचा”.
त्यांच्या घरची परिस्थिती इतकी नाजूक होती की हणमंत यांना लहानपणापासूनच छोटीमोठी कामं करावी लागली. त्यांच्याकडे आंब्याची सात-आठ झाडं होती. त्यावर येणाऱ्या आंब्याची त्यांनी रहिमतपूर रेल्वे स्थानकावर जाऊन विक्रीदेखील केली. त्यांनी सांगितले की, “आंब्यांची विक्री व्हावी म्हणून मी लोकांच्या मागे धावायचो. त्यावेळी मी पंचवीस पैशाला एक आंबा विकायचो. तीन रुपये डझन आंबे विकले होते”. त्यांच्या घरी चुलीवर स्वयंपाक केला जायचा. चुलीसाठी लागणारे इंधन गोळा करायची जबाबदारी त्यांच्यावर होती. बालपणीच्या काळातच त्यांना मोठा संघर्ष करावा लागत होता. हणमंतराव सांगतात की, “ त्या दिवसांत खूप मेहनत करावी लागायची, मात्र मी सारी कामं आनंदाने हसतखेळत करायचो”.
शिष्यवृत्ती मिळाल्याने त्यांच्यात आत्मविश्वास आणि उत्साह निर्माण झाला होता. या उत्साहातच त्यांनी पुस्तकांना आपले केले होते, सर्वोत्तम मित्र बनवले होते. हणमंत यांची हुशारी आणि उत्साह पाहून वडिलांच्या आशाही उंचावल्या होत्या. त्यांना वाटले की हणमंत यांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी पुणे शहरात वास्तव्यास जावे. त्यांनी विचार केला आणि प्रत्यक्षात अंमलबजावणीदेखील केली. त्यांचे संपूर्ण कुटुंब पुण्यात वास्तव्यास आले. पुण्यात हणमंतराव यांचे मामा किर्लोस्कर कंपनीत काम करायचे. त्यांच्या मदतीने पुण्याच्या जवळच फुगेवाडी परिसरात राहायला त्यांना घर मिळाले. हणमंतराव सांगतात की, “मिळालेले घर सातारा येथील घरापेक्षा लहान होते १०/१० ची एक खोली होती. खोलीत डबल खाट होती. दोनजण वरती आणि जण खाली झोपायचे”.
हणमंतराव यांनी लहानपणी अनेकदा गरीबीचे चटके सोसले होते. त्यांचे वडील आजारी पडल्यामुळे घराची परिस्थिती आणखीनच गंभीर बनली. त्यांच्या वडिलांची बदली मुंबईला झाली होती. मुंबईचे वातावरण त्यांच्या प्रकृतीला मानवले नाही. त्यांना मधुमेह झाला आणि त्यानंतर त्यांची प्रकृती ढासळतच गेली. प्रकृती इतकी खालावली की त्यांना वर्षाचे दोन ते तीन महिने रुग्णालयातच घालवावे लागायचे. मोठ्या रुग्णालयात उपचार घेणे आवाक्याबाहेरचे होते म्हणून सरकारी रुग्णालयातच उपचार सुरु होते. वडिलांच्या उपचारासाठी त्यांच्या आईने दागिने विकले. हणमंतरावांच्या त्यावेळेच्या संघर्षमय परिस्थितीतील आठवणी आजही ताज्या आहेत. त्यांना आठवते की त्यांच्या आईने तिच्या कानातले दागिने सोनाराकडे गहाण ठेवले होते, ज्यातून तिला दोनशे रुपये मिळाले होते. त्यातही सोनाराने पाच टक्के व्याजाचे ठरवले होते. त्यानंतर परिस्थिती आणखीनच बिकट झाली आईला मंगळसूत्रदेखील गहाण ठेवावे लागले. सावकाराने मंगळसूत्र त्याच्याकडे ठेवून ५०० रुपये दिलेत. यावेळी त्याचा व्याजाचा दर सहा टक्के होता. आलेल्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी त्यांच्या आईला सुद्धा काम करावे लागले. त्यांच्या आईने शिवणकाम सुरु केले. हणमंत त्यावेळी पुण्याच्या मॉडर्न स्कूल मध्ये शिकत होते. शाळा घरापासून खूप दूर होती. बस मधून ये-जा करण्यासाठी दररोज एक रुपया लागायचा. घर खर्चाची गरज पूर्ण करण्याकरिता त्यांची आई जवळच्याच महानगरपालिकेच्या शाळेत शिकवायला देखील जायच्या.
कठीण परिस्थितीत हणमंत यांचे शिक्षण सुरूच होते. त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेत जावे अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. हणमंत नवव्या वर्गात असताना कलेक्टर बनायचे स्वप्न पाहू लागले. त्यांना माहित होते की त्यासाठी त्यांना परीक्षेत चांगले गुण मिळवणे आवश्यक आहे. त्यांची बुद्धिमत्ता तल्लख होती, ते मेहनतही खूप करायचे त्यामुळे त्यांना दहावीच्या परीक्षेत ८८ टक्के मार्क्स मिळाले. त्यांनी दहावीची परीक्षा तर उत्तीर्ण केली, मात्र त्याच्या कुटुंबियांना माहित नव्हते की, पुढे काय करायचे ज्यामुळे चांगले करियर घडेल. ज्या शाळेत त्यांची आई शिकवायची त्याच शाळेतील मुख्याध्यापकांकडून सल्ला घेण्यात आला. मुख्याध्यापकांनी त्यांच्या अनुभवानुसार सल्ला दिला की हणमंत यांनी पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये प्रवेश घ्यावा. त्यावेळी पॉलिटेक्निक कॉलेज मधून पास झाल्यानंतर चांगली नोकरी मिळायची. त्या काळात चांगल्या मार्काने पास झालेले विद्यार्थी इलेक्ट्रॉनिक्स हा विषय निवडायचे. त्यामुळे हणमंत यांनीही इलेक्ट्रॉनिक्स या विषयाचीच निवड केली.
पुण्याच्या गवर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेजच्या आठवणी त्यांनी सांगितल्या, दरवर्षी ते चांगल्या टक्केवारीने उत्तीर्ण झाले. त्यांना पहिल्या वर्षी ७२ टक्के, दुसऱ्या वर्षी ७४ टक्के तर तिसऱ्या वर्षी ७२ टक्के मिळाले. हा अभ्यासक्रम सुरु असतानांच दुसऱ्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. या दुखद घटनेनंतर त्याच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हणमंत आणखी जोरदार तयारीला लागले.
पॉलिटेक्निक कोर्स पूर्ण केल्यानंतर हणुमंत बीटेकची डिग्री घेण्यास इच्छुक होते. याची दोन प्रमुख करणे होती. प्रशासकीय अधिकारी बनण्यासाठी डिग्री घेणे आवश्यक होते. आणि त्या दिवसांत डिप्लोमा केल्यानंतर अनेकजण डिग्रीसाठी इंजिनीयरिंग कॉलेज मध्ये प्रवेश घ्यायचे. हणमंत यांना औरंगाबाद गवर्नमेंट इंजीनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळत होता. मात्र आईने त्यांना कुटुंबापासून दूर राहून शिक्षण घेण्यास विरोध केला. त्यांच्या आईच्या विरोधामागे अनेक करणे होती. हणमंत यांचे वडील त्यांच्या आईवडिलांचे एकुलतेएक होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या म्हाताऱ्या आई-वडिलांची जबाबदारी देखील आईवर होती. हणमंत यांचा देखील त्यांच्या आईला त्यांचा खूप आधार वाटायचा. हणमंत हे त्यांचे बलस्थान होते. त्यांना वाटायचे की जर हणमंत शिकायला दूर गेला तर त्या एकट्याच पडतील. आईसाठी हणुमंत यांनी पुण्यात राहूनच इंजिनियरिंगचा अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी खासगी इंजीनियरिंग कॉलेजचे प्रवेशशुल्क जास्त असल्याकारणाने त्यांच्या आईला तेवढे पैसे भरणे कठीण काम होते, खरं तर अशक्यच होते. इतर इंजिनियरिंग कॉलेजमध्ये प्रवेशासाठी एक लाख रुपये डोनेशन मागत होते. डोनेशन भरावे लागू नये म्हणून हणमंत यांनी शहरापासून दूर असलेल्या विश्वकर्मा इंजिनियरिंग कॉलेजची निवड केली.
त्यांच्या आईने इंजिनियरिंगच्या शिक्षणाकरिता पुणे म्युनिसिपल को-आॅपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेतले. हणमंत यांचे कॉलेज घरापासून २० ते २१ किलोमीटर दूर होते. येण्याजाण्यावर पैसे खर्च होऊ नये म्हणून हणमंत सायकलने कॉलेजमध्ये जायचे. त्याच दिवसात त्यांच्या आईला मदत करण्याच्या दृष्टीने त्यांनी काम करण्याचे ठरवले आणि पॉलिटेक्निक डिप्लोमाच्या विद्यार्थांच्या शिकवण्या घेण्यास सुरुवात केली. त्यांचा मित्र योगेश अत्रे यांची त्यांना साथ लाभली. दोघेजण मिळवून शिकवण्या घेऊ लागले. इतकेच नाही हणमंत यांनी एक एजन्सीदेखील घेतली, ज्या माध्यमातून त्यांनी साॅस आणि जॅमची विक्री केली.
इंजिनियरिंगचा अभ्यास सुरु असतानाच हणमंत यांनी इमारतींना रंगकाम करायचे काम सुद्धा सुरु केले होते. रंगकाम करण्यामागेदेखील एक कारण होते. वडिलांच्या निधनानंतर त्यांच्या सेवानिवृतीची रक्कम त्यांच्या आईला मिळाली होती. याच रकमेच्या मोठ्या हिस्स्यातून त्यांच्या आईने पुण्यात दोन हजार स्क़्वेअर फिटची एक जागा खरेदी केली आणि याच जागेवर त्यांनी दोन खोल्यांचे घर बांधले. घर बांधल्यानंतर रंगकामासाठी कारागीर आणि मजूर त्यांच्या गावावरून बोलावले होते. जेव्हा मजूर काम करत होते तेव्हा त्यांच्याकडून रंगकामाविषयीचे सारे ज्ञान हणमंत यांनी अवगत केले. या व्यवसायातील सारी गणितं समजून घेतली. त्यांच्या लक्षात आले की या व्यवसायात जास्त नफा मिळवणे शक्य आहे. त्यामुळे त्यांनी हा व्यवसाय करायचे ठरवले आणि त्यांच्या सभोवताल असलेल्या गावातील आणि परिसरातील मजुरांना हाताखाली घेतले आणि रंगकाम करण्याचे कंत्राट घेऊन ते पूर्ण करण्यास सुरुवात केली. यामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती सुधारू लागली. तेव्हाच हणमंतराव एक रंगकाम व्यावसायिक झाले होते. त्यांनी सांगितले की, “ कोणतेही काम शिकण्यासाठी किवा समजून घेण्यासाठी मला खोलात जायला आवडते. जोपर्यंत मला पूर्णपणे समजत नाही तोपर्यंत मी त्या विषयाची पाठ सोडत नाही. उदाहरणार्थ – जर चुना लावायचा असेल तर त्याला किती खर्च येईल ? पाच किलो चुन्यात किती भाग व्यापला जाऊ शकतो ? ऑईल बॉंड लावायचा असेल तर किती खर्च येईल ? जर ऑईल पेंट लावायचा असेल तर किती खर्च येईल ? यासारख्या रंगकामविषयी बारीकसारीक गोष्टी मी समजून घेतल्या. मी अभ्यासले होते की या धंद्यात चाळीस टक्के नफा मिळवता येतो. त्यानुसार मग मी २० ते ३० टक्के आगाऊ रक्कम घेण्यास सुरुवात केली. आणि याच रकमेतून मी रंगकामाचे सामान खरेदी करायचो. ज्या कामासाठी रंगकाम मजुराला बाजारात १०० रुपये मिळायचे त्याच कामासाठी मी त्यांना सव्वाशे किवा दीडशे रुपये द्यायचो. जर तुमच्याकडे तीन ते चार मजूर आहेत तर तुम्ही महिन्याकाठी २० ते ३० हजाराचे काम करवून घेऊ शकता. या कामात तुम्हाला पाच ते सात हजार रुपये नफा मिळू शकतो. या कामामुळे माझा पार्टटाईम व्यवसाय सुरु झाला होता”.
याच गोष्टीवरून लक्षात येईल कि हणमंतराव यांचे गणित किती पक्के होते, ज्याचा वापर त्यांनी व्यवसायात करण्यास सुरुवात केली होती. रंगकाम व्यवसायाप्रमाणेच त्यांनी इतर व्यवसायाची गणितदेखील आखायला सुरुवात केली आणि नवीन व्यावसयिक संधीचा ते शोध घेऊ लागले.
हणमंत जेव्हा इंजिनियरिंग कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला होते तेव्हा त्यांना कळले की राष्ट्रीय खेळासाठी बालेवाडी स्टेडियममध्ये काम सुरु आहे. त्यांना बालेवाडी स्टेडियमच्या कामात खूप मोठ्या संधी उपलब्ध असल्याचे दिसून आले. मग त्यांनी हे काम मिळवण्यासाठी स्वतःला झोकून देऊन शर्थीचे प्रयत्न केले आणि त्यांना ते काम मिळाले देखील. काम पूर्ण झाल्यानंतर त्याचे पैसे वसूल करण्यासाठी देखील त्यांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले होते. या कामात हणमंत इतके तल्लीन झाले की शेवटच्या वर्षीचे पहिल्या सेमिस्टरचे काही पेपर्ससुद्धा त्यांनी दिले नाही. मात्र त्यानंतर त्यांनी अभ्यास करून सर्व विषयात ते पास झाले.
इंजिनियरिंगचा अभ्यास करताना त्यांच्या जीवनात खूप बदल घडले. आयुष्याला एक नवीन दिशा मिळाली होती. त्याच वेळी त्यांचे ध्येय निश्चित झाले होते. त्यांच्या जीवनावर छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंद यांच्या विचारांचा प्रभाव होता. हणमंतराव यांनी सांगितले की त्यांचे वडील त्यांना टिळक स्मारकात घेऊन जायचे. याच ठिकाणी हणमंत यांनी प्राचार्य शिवाजीराव भोंसले यांची वाख्याने ऐकली होती. त्यांची व्याख्यानं ऐकूण हणमंत यांच्या व्यक्तिमत्वावर एक सकारात्मक छाप पडली आणि या महान व्यक्तिमत्वांनी दाखवलेल्या रस्त्यावर त्यांनी चालायला सुरुवात केली. हणमंतराव यांनी त्यांच्या कॉलेजच्या दिवसातील त्या घटना पण सांगितल्या ज्यामुळे लोकांना मदत करण्यास ते प्रवृत्त आणि प्रोत्साहित झाले. त्यांनी सांगितले, “ माझ्या वडिलांना चांगल्याचुंगल्या कपड्यांची आवड होती. त्यांनी दोन थ्री पीस सूट शिवले होते. त्यांच्या निधनापुर्वीच त्यांनी ते शिवायला टाकले होते. त्यानंतर त्यांचे निधन झाले. नंतर मी टेलरकडून ते सूट घेऊन आलो. आजही ते सूट आमच्या घरात आहे. त्यावेळी मला जाणीव झाली की परलोकी जाताना कोणीही काहीही घेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे आयुष्यात काहीतरी वेगळे काम करावे आणि मग मी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली”.
वयाच्या १९ व्या वर्षापासूनच हणमंत यांनी लोकांना मदत करायला सुरुवात केली होती. समाजसेवेच्या हेतूनेच त्यांनी भारत विकास प्रतिष्ठानची स्थापना केली होती. आपल्या या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी गरजू आणि गरीब विद्यार्थ्यांना आर्थिक स्वरुपाची मदत करायला सुरुवात केली. ते सांगतात की, “ ज्यांना शिक्षण घेणे शक्य नव्हते त्यांना मी १०० किवा २०० रुपयाची मदत द्यायला सुरुवात केली”.
इंजिनियरिंगचा अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर हणमंत यांना टाटा इंजिनियरिंग एंड लोकोमोटिव कंपनी अर्थात टेल्को मध्ये नोकरी मिळाली. सध्या टेल्को टाटा मोटर्स या नावाने लोकप्रिय आहे. टेल्कोमध्ये काम करत असताना हणमंत यांच्या कारकिर्दीला नवीन आयाम प्राप्त झाले. त्यांना नवनवीन कामाच्या संधी उपलब्ध झाल्या. मिळालेल्या संधीचे त्यांनी सोने केले आणि प्रगती साधत गेले. त्यांनी टेल्को कंपनीच्या गोदामात वर्षांपासून पडून असलेल्या केबल वायरचा पुनर्वापर करायच्या पद्धती हुडकून काढल्या. हे काम त्यांनी त्यांचे सहकारी गणेश लिमये यांच्या सहाय्याने पूर्ण केले. केबलचा पुनर्वापर केला गेल्यामुळे टेल्को कंपनीला कोट्यावधी रुपयांचा फायदा झाला. नवीन विचारसरणी आणि नवीन कामाच्या पद्धतीने हणमंत यांनी कंपनीचा मोठ्या प्रमाणात फायदा करून दिला होता. त्यांच्या कामाची चर्चा सर्वत्र होऊ लागली होती. ही बाब कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली. हणमंत यांचे खूप कौतुक झाले. त्यांना शाबासकी मिळाली. टेल्कोच्या वाइस प्रेसिडेंटनी सुद्धा हणमंत यांचे तोंड भरून कौतुक केले आणि विचारले की कंपनी त्यांच्यासाठी काय करू शकते ? हे सांगताना हणमंतराव म्हणाले की, “वाइस प्रेसिडेंट नाड साहेबांनी मला सांगितले की, “बेटा तू खूप चांगले काम केले आहे. तू कंपनीच्या फायद्याचा विचार केला. मला सांग कंपनीने तुझ्यासाठी काय करावे असे तुला वाटते” तेव्हा मी नाड साहेबांना सांगितले होते की, त्यांच्या गावातील काही तरुण नोकरीच्या आशेने त्यांच्याकडे आले आहे. त्यांना तुम्ही कंपनीत काम द्या”.
त्यावेळी कोरेगाव येथील लोकांना वाटायचे की हणमंत मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करत आहे. आणि ते त्यांना नोकरी मिळवून देतील. हणमंत मदत करतील या हेतूने काही तरुण खूप आशेने पुण्यात आले होते. याच तरुणांना काम मिळण्यासाठी त्यांनी त्यांच्या वाइस प्रेसिडेंटला विचारणा केली होती. त्यावेळी हणमंत आपल्या वरिष्ठांना स्वतःसाठी काहीही मागू शकले असते, मात्र त्यांनी त्यांच्या गावातील बेरोजगार तरुणांसाठी नोकरी मागितली होती. त्यांना विचारणा झाली की गावातील तरुण काय काम करू शकतात ? तेव्हा ते हेल्परचे काम करतील असे हणमंत यांनी सांगितले. हणमंत यांनी यापूर्वी त्यांच्याकडून रंगकाम करून घेतले होते. त्यांना खात्री होती की ते तरुण टेल्कोमध्ये देखील चांगल्याप्रकारे काम करतील. मात्र कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की हणमंत या कंपनीचे कर्मचारी आहे. या नात्याने त्यांना कोणतेही कंत्राट देता येणार नाही. मात्र तिथल्याच अधिकाऱ्यांनी हणमंत यांना सुचवले की, कुठल्यातरी संस्थेच्या माध्यमातून त्याच्या गावातील तरुणांना कामाचे कंत्राट मिळू शकते. संस्थेचे नाव घेतल्यावर हणमंत यांनी ताबडतोब त्यांनी स्थापन केलेली संस्था भारत विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून गाववाल्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवसांत इंडिका कारचा प्लांट सुरु करण्यात आला होता. आणि याच प्लांटसाठी भारत विकास प्रतिष्ठानला पहिले कंत्राट मिळाले होते. कंत्राट व्यवस्थितपणे हाताळण्याची जबाबदारी हणमंत यांनी त्यांचे जुने मित्र उमेश माने यांच्यावर सोपवली होती. आमच्याशी बोलत असताना हणमंतराव यांनी त्यांचे मित्र उमेश यांचे भरपूर कौतुक केले. त्यांनी सांगितले की उमेश मानेंना ते लहानपणापासून ओळखायचे. उमेश हे त्यांच्यापेक्षा काही वर्षाने मोठे होते. उमेश यांची ‘दादागिरी’ पाहून हणमंत खूप प्रभावित झाले. हणमंत यांना वाटले की उमेश कोणाकडूनही काहीही काम करवून घेऊ शकतो. याच कारणामुळे त्यांनी उमेश यांना भारत विकास प्रतिष्ठान बरोबर काम करण्याबाबत विचारणा केली. उमेश यांना हणमंत यांच्या क्षमतेवर पूर्ण विश्वास होता. त्यांनी त्यांची बँकेतली नोकरी सोडून दिली आणि भारत विकास प्रतिष्ठानमध्ये रुजू झाले. जानेवारी, १९९७ मध्ये उमेश यांनी या संस्थेत कामाला सुरुवात केली. भारत विकास प्रतिष्ठानला पहिले कंत्राट मिळण्याच्या पाच महिने आधीच उमेश संस्थेत रुजू झाले होते. इंडिका प्लांटमध्ये पहिले दोन वर्ष उमेश यांच्या देखरेखीखाली भारत विकास प्रतिष्ठानने काम केले होते.
इंडिका प्लांटच्या याच कंत्राटावरून सुरु झाली होती हणमंतराव यांच्यातल्या यशस्वी व्यावसायिकाची घोडदौड. या कंत्राटाने हणमंत यांची झपाट्याने प्रगती होत गेली. २२ मे, १९९७ मध्ये त्यांना हे कंत्राट मिळाले होते. संस्थेला पहिल्या वर्षी आठ लाख, दुसऱ्या वर्षी ३० लाख, आणि तिसऱ्या वर्षी जवळपास ६० लाखाचे उत्पन्न मिळाले. याच दरम्यान १९९९मध्ये त्यांचा विवाह झाला. आणि भारत विकास प्रतिष्ठानला मिळणारा प्रतिसाद पाहून त्यांनी नोकरीला रामराम ठोकला. संपूर्ण लक्ष व्यवसायात केंद्रित करायचे ठरवले.
त्यांनी ज्यावेळी त्यांच्या या निर्णयाबाबत घरच्यांना सांगितले तेव्हा मात्र त्यांच्या घरातून खूप विरोध झाला. आई रागावली. आईच्या विरोधामागे अनेक कारणं होती. एक तर नोकरी खूप चांगली होती आणि कायमस्वरूपी होती. घरापासून ऑफिस पण जवळच होते. कंपनीतर्फे अनेक सुविधा मिळत होत्या. आणि महत्त्वाचे म्हणजे हणमंत यांचे नुकतेच लग्न झाले होते. एवढेच नाहीतर त्यांच्या कुटुंबातल्या सात पिढ्यांनी कधी व्यवसाय नव्हता केला. त्यांच्या नोकरी सोडण्याच्या निर्णयाने त्यांच्या आईला मोठा धक्का बसला होता. आईला समजावण्यासाठी हणमंत यांना खूप प्रयत्न करावे लागले होते. आईचे मन वळवण्यासाठी आईला त्यांनी ‘वचन’ दिले होते. त्यांनी सांगितले की, “ आईला मी म्हटले की तू मला १९९० पासून काम करताना बघते आहे. दहा वर्ष झाले मी काम करत आहे. या आठ तासाच्या नोकरीने काही होणार नाही. मी नोकरी आणि व्यवसाय दोघांनाही न्याय नाही देऊ शकत. माझे मन नोकरीत रमत नाही आणि व्यवसायाकडेही दुर्लक्ष होत आहे. मी आईला वचन दिले की मी कधीही चुकीचं काम करणार नाही, खोटं बोलणार नाही. असं कुठलंही काम करणार नाही ज्यामुळे तुझ्या आणि बाबांच्या नावाला बट्टा लागेल.” हणमंत यांनी दिलेले वचन ऐकून त्यांच्या आई भावूक झाल्या आणि त्यांनी नोकरी सोडून व्यवसाय करण्यास हणमंत यांना पाठिंबा दिला.
आईच्या आशीर्वादानंतर हणमंत यांचा उत्साह वाढला, त्यांनी त्याच्या व्यवसायात स्वतःला झोकून देऊन काम करण्यास सुरुवात केली. त्यांनी कंपनीचे ‘भारत विकास सर्विसेस’ असे नामकरण केले. या संस्थेने वेगवेगळ्या ठिकाणी, वेगवेगळ्या लोकांना आणि संस्थाना विविध सेवा पुरवण्याचे काम सुरु केले. गरजेनुसार हणमंत यांनी साफ-सफाई करणाऱ्या अद्ययावत मशीनरीज् खरेदी केल्या. यामुळे त्यांच्या कार्यक्षेत्राचा झपाट्याने विस्तार होत गेला. हणमंतराव यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या कर्मचाऱ्यांनी फक्त ऑफिसेस, भवन, इमारती यांनाच चमकवले नाही तर आपल्या कंपनीचे नावही खूप मोठे केले. भारत विकास सर्विसेज यांच्या दर्जेदार कामाची चर्चा देशाच्या कानाकोपऱ्यात होऊ लागली.
वर्ष २००४ मध्ये भारत विकास सर्विसेसला एक असे काम मिळाले ज्यामुळे त्यांची लोकप्रियता आणखीनच वाढली. याच वर्षी भारत विकास सर्विसेसला भारतीय संसद भवनाचे काम मिळाले. हे काम देण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर या कामाचे कंत्राट भारत विकास सर्विसेसला मिळाले. पुढे पंतप्रधान कार्यालयाचे कामही या संस्थेला मिळाले. त्यांच्या संस्थेच्या प्रगतीचा आलेख अधिकाधिक उंचावत गेला. ग्राहक संख्या वाढतच गेली. देशातल्या मोठमोठ्या संस्थांची कामं त्यांना मिळाली. सरकारी भवन, रेल्वेगाड्या, रेल्वे स्थानक, एअरपोर्ट, कॉर्पोरेट भवन, मंदिर यासारख्या ठिकाणच्या कामाची जबाबदारी या संस्थेवर सोपवण्यात आली. या संस्थाना अपेक्षित सेवा वेळेवर दिल्या जातात. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा देण्यासाठी वेगवेगळ्या संस्थांचे जाळे उभे करण्यात आले आणि त्याला ‘भारत विकास ग्रुप’ असे नाव देण्यात आले.
‘भारत विकास ग्रुप’ने परदेशातही आपला विस्तार करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या देशात भारत विकास ग्रुप तर्फे विविध योजना राबवण्यात येत आहेत. ऑगस्ट २०१६ मध्ये भारत विकास ग्रुपच्या कर्मचाऱ्यांची संख्या ६५००० हून अधिक झाली आहे. भारत विकास ग्रुप देशातील २० राज्यांमध्ये ८००हून अधिक ठिकाणी आपल्या सेवा प्रदान करत आहे.
तुमच्या यशाचा मूलमंत्र काय अशी विचारणा केली असता हणमंतराव सांगतात, “ मी स्वतःची इतरांबरोबर कधीच तुलना केली नाही. स्वतः मध्ये असलेल्या क्षमतांचा पूर्णतः वापर करत गेलो आणि आजवरची प्रगती साधली”. ते पुढे सांगतात की, “प्रत्येकाने आपण कोणत्या क्षेत्रात निपुण आहोत हे जाणून घेतले पाहिजे त्यानंतर त्याच क्षेत्रात प्रामाणिकपणे काम केल्यास यश प्राप्त करणे शक्य होते”
आपण स्वत:ला नशिबवान मानता की संघर्ष, महत्वाकांक्षा आणि मेहनत हेच यशाचे गमक आहे असे मानता अशी विचारणा केली असता हणमंतराव सांगतात की, “ मी नशीब मानतो, ते किती असते ते मात्र माहित नाही. जर आपण जांभळाच्या झाडाखाली बसलो आणि जांभळाचा रस सरळ आपल्या मुखात जावा अशी अपेक्षा करत असलो तर ते चूकच आहे. आपल्याला जांभळाचा रस हवा असेल तर झाड हलवावे लागेल म्हणजेच मेहनत करावी लागेल. नशीब म्हणत बसून काहीच होत नाही”
याच संदर्भात हणमंतराव म्हणाले की, “ परमेश्वराने मला खूप काही दिले आहे. मी स्वच्छ मनाने काम करतो. कधीच कोणते चुकीचे काम केले नाही, करणार नाही. दिवसभर काम करून रात्री जेंव्हा बिछान्यावर पडतो तेंव्हा लगेच झोपी जातो. हेच सर्वात मोठे यश आहे असे मी मानतो. बस हेच स्वप्न आहे- लाखो लोकांचे हित साधायचे आहे, कोट्यावधी लोकांपर्यंत पोहोचायचे आहे.”
हणमंतराव यांना जीवनात अनेकदा निंदा सहन करावी लागली आणि अपमानही पचवावे लागले. ते जेंव्हा अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होते त्यावेळी राष्ट्रीय खेळांसाठी तयार होणा-या बालेवाडी मध्ये काम मिळण्याची अपेक्षा होती. अनेक स्वप्न उराशी बाळगून ते जिल्हाधिकारी कार्यालयात जात असत. तेथे दिवसभर वाट पहात बसत, ही अपेक्षा की जिल्हाधिकारी त्यांना बोलावतील. जिल्हाधिकारी यांना माहिती होते की हणमंत बाहेर बसले आहेत, वाट पहात आहेत. पण त्यांनी त्यांना बोलावले नाही. कार्यालयातून आत-बाहेर जाताना त्यांनी त्यांना पाहिले मात्र विचारणा केली नाही. अशा घटना हणमंत यांच्या जीवनात अनेक आल्या, ते उदास, निराशही झाले मात्र त्यांनी आपली हिंमत कायम ठेवली. धाडस केले. मानसिक खच्चीकरणही झाले. ते सांगतात, “ माझी कुणी निंदा केली तरी ती सकारात्मक दृष्टीने स्विकारतो. कुणी अपमान केला तर समजतो की, त्याला माझे महत्वच समजले नाही.” ज्या प्रकारे त्यांनी हे यश मिळवले आहे, त्याची कहाणी लिहून, वाचून अनेकांना प्रेरणा मिळते. हणमंत यांना त्यांच्या यशाची कहाणी लोकांसमोर सांगण्यासाठी अनेक संस्था आमंत्रित करतात. संधी मिळाली तर तेही लोकांसमोर जाऊन भाषणे देतात, लोकांना काही नवे चांगले करण्याची प्रेरणा देतात.
ते हे सांगायला मागे राहात नाहीत की, एक माणूस सारे काही करु शकत नाही. चांगला नेता असण्यासाठी भरोसा ठेवता येईल अशी चांगली सहकारी माणसेही असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे जीवनात जे कुणी भरोश्याचे प्रतिभावान दिसले हणमंत यांनी त्यांना भारत विकास ग्रुपमध्ये जोडले. जबरदस्त संच तयार केला आणि त्या संचात प्रत्येकाला जबरदस्त बनविले. आपल्या संचाला ते आपले कुटूंब मानतात. ते सांगतात की,
“ चांगले बुध्दीमान लोक तर खूप असतात, पण जर एखाद्या संस्थेला जागतिक बनवायचे असेल तर काम करणारे लोक पाहिजेत. असे लोक पाहिजेत ज्यांच्यावर विश्वास ठेवता येईल. अशी माणसे हवी आहेत ज्यांना समोर काय आहे ते समजते आणि ते पूर्ण करण्यासाठी ते तुम्हाला सहकार्य करतील.”
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा