इतिहास घडवणा-या एका जिद्दीची कहाणी..एअरबस ए-300च्या पहिल्या महिला कमांडर इंद्राणी सिंह..
कौन कहता है की आसमान में छेद नहीं होता
एक पत्थर तो तबियत से उछालो यारों !
हिंदीतली ही म्हण दिल्लीच्या इंद्राणी सिंह यांना अगदी तंतोतंत लागू होते. आणि त्याची तीन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्या एअरबस ए-३०० या प्रवासी विमानाच्या जगातल्या पहिल्या महिला कमांडर आहेत. दुसरं म्हणजे एअरबस ए-३२० या प्रवासी विमानाच्या त्या आशियातल्या पहिल्या महिला व्यावसायिक वैमानिक अर्थात पायलट आहेत. आणि तिसरं कारण म्हणजे ‘लिटरसी इंडिया’ या त्यांच्या अनोख्या संस्थेच्या त्या संस्थापक सचिव(फाऊंडर सेक्रेटरी) आहेत.

एअरबस ए-३०० च्या पहिल्या महिला कमांडर इंद्राणी सिंह
इंद्राणी या आज एक यशस्वी आणि इतिहास घडवणा-या महिला पायलट आहेत. मात्र इथपर्यंतचा त्यांचा प्रवास काही सोपा नव्हता. मोठमोठी प्रवासी विमानं एक पायलट म्हणून हाताळण्याव्यतिरिक्त त्या गरीब मुलांना शिक्षण देणं आणि त्यांच्यासारख्याच इतर महिलांना स्वावलंबी बनवण्याचंही मोठं काम करत आहेत. इंद्राणी यांचं बालपण खरंतर दोन वेगवेगळ्या संस्कृती, चालीरीतींमध्ये गेलं. कारण त्यांची आई बंगाली होती, आणि त्यांचे वडील राजपूत. दिल्लीतच इंद्राणी यांनी आपलं शालेय शिक्षण आणि कॉलेज पूर्ण केलं. कॉलेजमध्ये असताना इंद्राणी एनसीसीमध्ये(नॅशनल कॅडेट कॉर्प) ग्लायडर पायलट होत्या. त्यामुळे तेव्हापासूनच त्यांना आकाशात भरारी मारण्याची आवड निर्माण झाली. खरंतर हा तो काळ होता, तेव्हा या क्षेत्रात मुली येत नव्हत्या. त्यामुळे इंद्राणींसाठी हे क्षेत्र अगदीच नवं होतं. दरम्यानच्या काळात इंद्राणींच्या वडिलांना व्यवसायात मोठं नुकसान झालं. त्यामुळे घरची आर्थिक परिस्थिती बेताची झाली. मात्र तरीही मुलीची पायलट होण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी त्यांच्या वडिलांनी कर्ज काढण्याचा निर्णय घेतला. यानंतर इंद्राणी यांचा निर्धार अधिकच पक्का झाला. त्यांना हवेत उंच भरारी घ्यायची होती आणि जगभरात एक यशस्वी महिला पायलट म्हणून आपला कायमस्वरूपी ठसा उमटवायचा होता.
समाज घडवायची जिद्द !
इंद्राणी सांगतात की त्या काळात त्यांच्याप्रमाणेच इतरही अनेक मुलींनी या क्षेत्राची निवड केली होती. त्यांची संख्या मात्र कमी होती. त्यातही अनेक मुलींना मध्येच आपला निर्णय बदलून हे क्षेत्र सोडावं लागलं. आणि त्याचं कारण मोठं अजब होतं. त्यांना एकट्याने फ्लाईंग क्लब (वैमानिक प्रशिक्षण केंद्र)पर्यंत घरापासून खूप दूर एकटंच जावं लागत होतं. त्यातही मुली एकट्याच एखादं मोठं विमान कसं उडवू शकतात अशी एक सर्वमान्य शंका होती. या अशा विचारसरणीमध्ये इंद्राणी एकट्याच या क्षेत्रात मार्गक्रमण करत राहिल्या. दिल्ली फ्लाईंग क्लबमध्ये वैमानिक प्रशिक्षणादरम्यान त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. अगदी त्यांच्यासोबत शिकणा-या प्रशिक्षणार्थी पुरूष वैमानिकांचा दृष्टीकोन वेगळाच असायचा. एवढंच नाही, तर त्यांना काय बरोबर आहे आणि काय चुकीचं आहे हेही सांगायला कुणी यायचं नाही. इंद्राणी ज्या मोटारसायकलने फ्लाईंग क्लबपर्यंत जायच्या, त्या मोटारसायकलची हवा काही लोक मुद्दामहून सोडून द्यायच्या. मात्र यामुळे इतर कुणापुढे मदतीसाठी हात पसरण्याऐवजी इंद्राणी स्वत: मोटारसायकल धक्का मारत गॅरेजपर्यंत घेऊन जायच्या. या अडचणीच्या आणि मानसिक ताणाच्या वातावरणातही इंद्राणींचा निर्धार ठाम राहिला आणि त्यांनी त्यांचं प्रशिक्षण पूर्ण केलं.

लहानग्यांची स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास
ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर १९८६ मध्ये इंद्राणींना पायलट बनण्याचा परवाना (लायसन्स) मिळाला आणि अगदी थोड्याच कालावधीत त्या एअर इंडियाची बोईंग-७३७ श्रेणीतली प्रवासी विमानं उडवू लागल्या. आजतागायत, म्हणजे गेल्या २६ वर्षांपासून इंद्राणी एअर इंडियाची विमानं उडवत आहेत. इंद्राणी म्हणतात, “मला एअर इंडियामध्ये असताना अनेकदा इतर विमान कंपन्यांकडूनही नोकरीचे प्रस्ताव मिळाले. पण मी एअर इंडियाला नाही सोडलं. कारण मला वाटतं की ज्या संस्थेनं तुम्हाला एक नवी ओळख दिली, तुमच्यावर विश्वास ठेवला त्या संस्थेला अशाप्रकारे सोडून जाणं योग्य नाही.” पण असं असलं, तरी नोकरीदरम्यानही इंद्राणींना अनेकवेळा भेदभावाचा सामना करावा लागला. कारण तेव्हा कोणतीच महिला फर्स्ट ऑफिसर अर्थात प्रमुख नेतृत्व अधिकारी पदावर कार्यरत नव्हती. मात्र आपल्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर इंद्राणींनी प्रत्येक संकटाचा सामना यशस्वीरित्या केला.
इंद्राणी काही आठवणीही सांगतात. इंद्राणी एकदा एअरबस ए-३२० या प्रवासी विमानाचं प्रशिक्षण घेण्यासाठी फ्रान्सला गेल्या होत्या. पण विशेष म्हणजे अमेरिका, इस्त्रायल आणि इतर एक-दोन देश सोडले, तर दुस-या कोणत्याच देशाची महिला पायलट तिथे नव्हती. तेव्हा तिथल्या लोकांना इंद्राणींना पाहून आश्चर्य वाटायचं. त्यांना एकाच गोष्टीचं आश्चर्य वाटायचं, ते म्हणजे ज्या देशातल्या महिला चेह-यावर कायम पदर ओढून असतात, तिथली महिला पायलट ट्रेनिंगसाठी इतक्या दूर कशी येऊ शकते. त्याचप्रमाणे एअरबस ए-३०० या विमानाच्या प्रशिक्षणाचीही आठवण इंद्राणी सांगतात. त्या काळात या प्रकारातली विमानं उडवण्यासाठी कुणीच पायलट नव्हता. त्यामुळे या विशेष कामगिरीबद्दल एअरबसने त्यांच्यावर एक लेख छापला. त्यानंतरही अनेकांना हा प्रश्न पडला होता, की एखादी तरूण आणि तीही महिला व्यक्ती एवढ्या मोठ्या विमानाची कमांडर होणं शक्य आहे का? मात्र उत्साह आणि पक्का निर्धार यांच्या जोरावर इंद्राणी यांनी या सगळ्या प्रश्नांचा चोख प्रत्युत्तर दिलं.

गरीब मुलांना मायेचा हात..आणि शिक्षणाची साथ
इंद्राणी यांचं लग्न कोलाकातामध्ये १९८७ साली झालं. त्यांचे पतीही याच व्यवसायात असून ते सीनिअर कॅप्टन (वरिष्ठ वैमानिक) आहेत. इंद्राणी म्हणतात की त्यांचं आयुष्य अगदी व्यवस्थित चाललं होतं. सर्वकाही आलबेल, पण तरीही त्यांना असं नेहमी वाटायचं की या सगळ्यात काहीतरी कमी आहे. लहानपणीही त्यांना असं जाणवायचं, की त्या शाळेत जात आहेत, मात्र त्यांच्यासारखीच इतर कित्येक मुलं आहेत ज्यांना गरीबीमुळे भीक मागावी लागते, उपाशीपोटी रहावं लागतं, शाळेत जाता येत नाही. याची एक वेगळी आठवण इंद्राणी सांगतात. एक दिवस त्या कोलकात्यात असताना रस्त्यावर त्यांनी एक विलक्षण दृश्य पाहिलं. तिथे एक नन अर्थात साध्वी गरीब मुलांना जवळ बसवून त्यांचे केस विंचरत होती, त्यांना तयार करत होती. ही गोष्ट इंद्राणी यांच्यावर मोठा प्रभाव पाडून गेली. त्या विचार करत राहिल्या की इतक्या घाणीत जाऊन कुणी इतक्या निस्वार्थी भावनेतून कसं काम करू शकेल. त्यांच्या या विचारांना चालना देणारा एक योगायोग पुढे घडला. थोर सामाजिक कार्यकर्त्या मदर तेरेसा यांना एकदा विमानाने कुठेतरी उपचारांसाठी नेलं जात होतं. आणि विशेष म्हणजे इंद्राणी स्वत: त्या विमानाच्या पायलट होत्या. जेव्हा इंद्राणींना ही गोष्ट लक्षात आली, तेव्हा त्यांनी मदर तेरेसांना एक लेखी संदेश पाठवला. त्यात त्यांनी लिहिलं होतं, ‘डिअर मदर, आय वाँट टू बिकम फ्लाईंग नन’(प्रिय मदर तेरेसा, मला एक फ्लाईंग नन व्हायचंय). इंद्राणी यांची ही चिठ्ठी वाचून मदर तेरेसा यांच्यासोबत प्रवास करणा-या सिस्टर शांती यांच्या मनाला लागली. पण यावर मदर तेरेसा प्रसन्नपणे हासल्या आणि त्यांनी इंद्राणींना त्यांच्या चिठ्ठीचं उत्तर पाठवलं. त्यात लिहिलं होतं, ‘मुली, तू स्वत: कॅप्टन आहेस, आणि तू काहीही करू शकतेस.’
उद्याचा भारत घडवण्याचं स्वप्न
यातून इंद्राणींनी महिला आणि मुलांसाठी काहीतरी काम करण्याचा निश्चय केला. आणि फक्त निश्चय करूनच त्या थांबल्या नाहीत, तर १९९५ साली त्यांनी दिल्लीजवळच्या गुडगावमधून एका महिला शिक्षिकेला सोबत घेतलं आणि ५ गरीब मुलांना शिकवायला सुरुवात केली. सुरुवातीच्या दिवसांमध्ये त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पहिल्यांदा तर त्यांना अशी जागा शोधायचं मोठं आव्हान पार करावं लागलं, ज्या ठिकाणी गरीब लहान मुलं अगदी सहज पोहोचू शकतील. त्यासाठी त्यांनी आसपास बांधकामं सुरु असलेल्या काही बिल्डरांची भेट घेतली. त्यांना इंद्राणींनी विनंती केली की काही काळासाठी या इमारतींमधला एखादा फ्लॅट मुलांना शिकवण्यासाठी द्यावा. सुदैवानं त्यांना तशी जागा मिळाली. हळूहळू त्यांच्या या अनोख्या शिकवणीमध्ये मुलांची संख्या वाढायला लागली आणि त्यांना वाटलं की आता या मुलांच्या शिकवण्यासाठी अशी जागा हवी जी या मुलांना एक नवी ओळख मिळवून देईल. त्यातूनच त्यांनी पुढे १९९६ मध्ये आपल्या काही सहका-यांच्या मदतीने ‘लिटरसी इंडिया’ या संस्थेची स्थापना केली. आणि मग हळूहळू इतरही काही लोक त्यांच्या या उपक्रमात सहभागी झाले, मुलांची संख्या वाढली आणि त्यांनी लावलेल्या एका छोट्याशा रोपट्याचं रूपांतर मोट्या वृक्षात व्हायला लागलं.

महिलांना स्वावलंबी बनवायचंय
इंद्राणींनी लावलेल्या या छोट्याशा रोपट्याचा आज खरंच एक मोठा वटवृक्ष झालाय. देशभरातल्या ११ राज्यांमध्ये ‘लिटरसी इंडिया’ची ५५ केंद्रं आहेत. या राज्यांमध्ये दिल्ली एनसीआर(नॅशनल कॅपिटल रिजन) तर आहेच, मात्र त्याचबरोबर पश्चिम बंगाल, झारखंड, कर्नाटक, तेलंगणा, उत्तर प्रदेश अशा इतरही राज्यांचा समावेश आहे. या संस्थेमध्ये आता फक्त गरीब मुलांना शिक्षणच दिलं जात नाही. आता हे काम अधिक व्यापक होऊन ‘इंधा’ या प्रकल्पाच्या माध्यमातून गरीब महिलांनाही स्वावलंबी बनवण्याचा प्रयत्न केला जातो. या प्रकल्पामध्ये या महिला हाताने विणलेल्या बॅग्स, घरसजावटीचं सामान, विविध प्रकारच्या भेटवस्तू आणि कागदाच्या पुनर्वापरातून विविध वस्तू तयार करतात. यासोबतच गरीब मुलांना शिक्षण देण्यासाठी ‘लिटरसी इंडिया विद्यापीठ’, पाठशाला आणि गुरुकुल अशा तीन स्वतंत्र शाखाही कार्यरत आहेत. मुलांना चांगल्या दर्जाचं शिक्षण देणं, त्यांच्या भवितव्याविषयी योग्य निर्णय घेण्याची क्षमता मुलांमध्ये निर्माण करणं आणि मुलांना विविध प्रकारच्या कौशल्यांमध्ये पारंगत करणं हे तीन मुख्य हेतू घेऊन या शाखा काम करतात. ‘लिटरसी इंडिया’च्या याच महत्त्वाकांक्षी प्रकल्पांमुळे आज ५० हजारांहून जास्त गरीब महिला आणि मुलांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली आहे.
मुलांच्या सर्वच कलागुणांना वाव
इंद्राणी सांगतात की जेव्हा त्यांनी हे काम सुरु केलं होतं, तेव्हा लोकांना मोठं आश्चर्य वाटायचं. एक उत्तम नोकरी आणि भविष्य हातात असतानाही इंद्राणी यांना ही समाजसेवा का करावीशी वाटली असा प्रश्न लोकांना पडायचा. इंद्राणींनी गुडगावमधल्या बजघेडा गावातून आपल्या या अनोख्या समाजसेवेला सुरुवात केली. मात्र हे वाटतं तितकं सोपं नक्कीच नव्हतं. सुरुवातीच्या काळात त्यांना मोठ्या आर्थिक अडचणीही आल्या. या कामासाठी आर्थिक पाठबळ उभं करण्यासाठी अनेकदा लोक त्यांना वेगवेगळे सल्ले द्यायचे. एवढंच काय, आर्थिक समस्या सोडवण्यासाठी ज्याच्याशी इंद्राणींचा दूरदूरपर्यंत संबंधही नव्हता असा फॅशन शोही त्यांना आयोजित करावा लागला. नंतर कुणीतरी त्यांना या गरीब मुलांना थिएटरचं अर्थात नाटकाचं प्रशिक्षण देण्याचा सल्ला दिला. आणि आनंदाची बाब म्हणजे इंद्राणींच्या समस्यांना ही मात्र अगदी योग्य लागू पडली. आज ‘लिटरसी इंडिया’मध्ये शिकणारी मुलं नाटक फक्त शिकतच नाहीत तर संधी मिळताच देशात वेगवेगळ्या ठिकाणी या नाटकाचे प्रयोगही करतात. इंद्राणींमुळेच त्यांच्या या संस्थेत नाटक शिकणा-या अनेक मुलांना राष्ट्रीय पातळीवर ओळख मिळाली. ‘थ्री इडियट्स’ या सिनेमामध्ये मिलीमिटरचं काम करणारा बालकलाकार राहुलने ‘लिटरसी इंडिया’तच अभिनयाचे धडे गिरवले आहेत. त्याच्याशिवाय अजून ७ विद्यार्थीही सध्या चित्रपटक्षेत्रात चांगलं नाव कमावत आहेत.
असं असलं तरी या मुलांना फक्त प्राथमिक आणि आवश्यक तितकंच शिक्षण देऊन इंद्राणी थांबल्या नाहीत. या मुलांना बदलत्या तंत्रज्ञानाची आणि डिजिटल विश्वाचीही ओळख व्हावी म्हणून ‘लिटरसी इंडिया’मध्ये ‘ग्यानतंत्र डिजिटल दोस्त’ या नावाचा एक अभिनव प्रकल्प राबवला जातोय. यासाठी एक विशिष्ट प्रकारचं कम्प्युटर सॉफ्टवेअरही तयार करण्यात आलंय. या सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मुलांची शिक्षणातली रूची वाढावी अशा पद्धतीने सर्व विषय शिकवले जातात. इंद्राणी यांच्यादृष्टीने विशेष बाब ही आहे की हाच प्रकल्प दिल्ली एनसीआरमधल्या अनेक सरकारी शाळांमध्येही त्यांच्या संस्थेच्या मदतीने चालवला जातोय. इंद्राणी सिंह यांनी आता पन्नाशी पार केली आहे. मात्र अजूनही त्यांच्याच पूर्वीचाच उत्साह आणि हिंमत कायम आहे. अजूनही इंद्राणी गरीब मुलांना शिकवण्यासाठी आणि महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी त्याच उत्साहात झटत आहेत, जो उत्साह त्यांच्यात स्वत:च्या करिअरला सुरुवात करताना होता.