जगप्रसिध्द चॉकलेट आणि कन्फेक्शनरी कंपनी फेरेरो १.५ मेगावॅट सौर उर्जा प्रकल्पाची निर्मिती करणार
भविष्यातील विजेची गरज लक्षात घेत अपारंपारिक ऊर्जा स्त्रोतांच्या माध्यमातून वीज निर्मितीला अलिकडे मोठ्या प्रमाणात चालना मिळत आहे. सीएसआर (कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलीटी) च्या माध्यमातून असाच एक सौर ऊर्जा प्रकल्प पुणे जिल्ह्यात बारामती येथे साकारला आहे, त्याविषयी जाणून घेवूया.
जगप्रसिध्द चॉकलेट आणि कन्फेक्शनरी कंपनी फेरेरो ने १.५ मेगावॅट क्षमता असणा-या सौर उर्जा प्रकल्पाच्या निर्मितीची नुकतीच घोषणा केली. त्यांच्या बारामती येथील निर्मिती प्रकल्पाला या प्रकल्पातून वीज मिळणार आहे. महाराष्ट्राने अशा प्रकारच्या रूफ टॉप सौर ऊर्जा निर्मितीचा उच्चांक सध्या गाठला आहे. फेरेरो ही भारतातील अशा प्रकारे सौर उर्जेच्या माध्यमातून त्यांना आवश्यक वीज निर्माण करणारी आणखी एक कंपनी म्हणून पुढे आली आहे.

यासाठी फेरेरोने १.२ दशलक्ष युरो म्हणजेच ८.८कोटी रूपयाची गुंतवणूक केली आहे. हा प्रकल्प बावीस हजार चौरस मीटर क्षेत्रात पसरला आहे आणि कारखान्याच्या एकूण विजेच्या गरजेच्या ८.४टक्के भार उचलणार आहे. हा नवा सौर ऊर्जा प्रकल्प २,२५,०००० केडब्ल्यूएच प्रति वर्ष (२२५० मेगा वॅट) वीज निर्मिती करणार आहे. त्यामुळे कंपनीला त्यांच्या प्रकल्पातून १.९२६टन कार्बन ची मात्रा घटविण्यात यश येणार आहे, ज्याचा पर्यावरणासाठी फायदाच होणार आहे.

“ स्वच्छ आणि हरित ऊर्जा निर्मितीसाठी आम्ही सुरू केलेल्या समाजाला मोठा फायदा मिळणार आहे” असे कंपनीच्या प्रवक्त्याने सांगितले. अशा प्रकारे फेरेरो कंपनीने त्यांच्या कार्बन फूटप्रिंटमध्ये कपात करत नैसर्गिक जैवचक्राला मदतच केली आहे. या प्रकल्पाशी आम्ही बांधील आहोत आणि यातून लोकांचे जगणे अधिक सुसह्य करत आहोत असे कंपनीच्या प्रवक्त्याने पुढे सांगितले. या सौर ऊर्जा प्रकल्पातून सुमारे १५०० ते दोन हजार घरांना दररोज पुरेश्या प्रमाणात वीज देवून त्यातून वार्षिक ३.६कोटी रूपयांची बचत देखील केली जाणार आहे.