रक्तदानातून मानवसेवेचे व्रत चालवणाऱ्या वंदना सिंह
रक्तदान, श्रेष्ठदान... असे पोस्टर आपल्याला ठिकठिकाणी पहायला मिळतात. आजूबाजूला, लोकलमध्ये, बसमध्ये जिथं नजर जाईल तिथं सर्वत्र हा संदेश दिसतो. पण भारतातले लोक अजूनही रक्तदानाबद्दल तेवढे सजग नाहीत. रक्तदानाचं महत्व त्यांना तेव्हाच पटतं जेव्हा त्यांना स्वत:साठी किंवा आपल्या नातेवाईकासाठी रक्ताची गरज भासते. मग धावपळ सुरु होते. या रक्तपेढीतून त्या रक्तपेढीत. अनेकदा पैसे मोजूनही रक्त उपलब्ध होत नाही. त्यामुळं रुग्ण दगावतो. मुंबईत असताना वंदना सिंह यांनी या सर्व गोष्टी पाहिल्या होत्या. याबद्दलच्या घटना ऐकल्या होत्या. पण मुंबईतून वाराणसीला गेल्यानंतर एकेदिवशी रक्तदान करताना त्याचं महत्त्व पटलं आणि आता रक्तदानाची मोहिमच सुरु करायची अशी त्यांनी खुणगाठ बांधली आणि सुरु झाला ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींग. हा रक्तदान करणाऱ्यांचा ग्रुप आहे. तो भारतातल्या अनेक शहरांमध्ये वाढत आहे. त्यामुळे आपली पाच वर्षांची मेहनत कामी येत आहे याचं समाधान वंदना सिंग यांच्या चेहऱ्यावर साफ दिसत आहे.

वंदना सिंग... मुळच्या मुंबईच्या.. बालपण इथंच गेलं. पण काही वर्षांनंतर संपूर्ण कुटुंब वाराणसीला गेलं. वंदना त्यावेळी असतील १२-१४ वर्षांच्या. शाळेत कॉलेजमध्ये रक्तदानाचे महत्त्व सांगणारे फलक त्यांनी पाहिले होते. पण प्रत्यक्षात रक्तदानाचा अनुभव कधी आला नव्हता. तो आला तो ही अश्या आपतकालिन घटनेच्या वेळी आणि रक्तदानाचा संदेश फक्त भिंतीवर न राहता तो प्रत्यक्षात आणण्यासाठी त्यांनी कंबर कसली. त्यासाठी त्यांना साथ मिळाली ती मित्रांची. कारण वाराणसीसारख्या शहरात राहून रक्तदानाची मोहीम राबवणं तेवढं सोपं नव्हतं.
“सर्वात पहिला विरोध घरातूनच झाला. नातेवाईकांनी तर वेड्यात काढलं. पण रक्तदान किती महत्त्वाचं आहे हे त्यांना पटवून सांगण्याची ती वेळ नव्हती. तेव्हा जर मी कृती केली नसती आणि त्यांच्या बोलण्याप्रमाणे वागले असते तर आज जी ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींगची व्याप्ती वाढली आहे, ती पाहायला मिळाली नसती. ज्यांनी विरोध केला होता तेच आता म्हणतात तू माणूसकीचं काम करतेय. बरं वाटतं.” वंदना आपल्या अनुभव सांगत होत्या.

वंदना सिंग यांच्या मनात जेव्हा ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींग सुरु करण्याचा विचार आला तेव्हा फक्त रक्तदात्यांना जोडणं हाच एक मुख्य उद्देश नव्हता. तर कुठल्याही गटाचं रक्त, कधीही, कुठेही मोफत मिळावं अशी अपेक्षा होती. कारण अनेकांना योग्यवेळी रक्त न मिळाल्यानं आपला जीव गमवावा लागल्याच्या अनेक घटना त्यांनी पाहिल्या आणि अनुभवल्याही होत्या. त्यामुळे रक्तदानाची ही श्रृखंला अविरत आणि अखंड चालू राहायला हवी असं त्यांना वाटत होतं.

ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींगची सुरुवात २०११ मध्ये झाली. तेव्हा फक्त काहीच रक्तदाते होते. हळूहळू जसजसं या ग्रुप बद्दल लोकांना समजलं तसतशी रक्तदात्यांची संख्या वाढत गेली. वंदना सांगतात “ लोकांचे रक्तदानाबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे आपल्या देशात रक्तदानासाठी अशी मोहिम चालवावी लागते. खरंतर लोकांनी तीन महिन्यांनी स्वत:हून रक्तदान केलं पाहिजे. आम्ही या ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींगच्या माध्यमातून जास्तीत जास्त रक्तदात्यांना जोडण्याचा प्रयत्न करत आहोत. हे प्रयत्न आता पाच वर्षांनी फळाला आलेत. आमच्या रक्तदात्यांची संख्या वाढते आहे आणि देशभरात त्याची व्याप्तीही. सध्या आम्ही १०० शहरात रक्तदात्याचं नेटवर्क सुरु केलंय. रक्तदात्याला आमच्याकडे नोंदणी करावी लागते. ती अगदी सोपी प्रक्रिया आहे. अनेकदा यासाठीच लोक रक्तदानापासून वंचित राहतात म्हणून आम्ही ती खुपच सोपी ठेवलीय. आता या शंभर शहरांमधून कधी कुणाला रक्त हवं त्यांनी फोन करावा आपला रक्तगट सांगावा. म्हणजे आमचा रक्तदाता तिथं पोचतो आणि रक्तदान देऊन परत येतो. आपत्कालिन परिस्थितीतही आम्ही काम करतो. त्यामुळे रात्री-अपरात्री कितीही वाजता रक्तदाता उपलब्ध होतो. असं ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींगचं काम चालतं.”

सध्या वेबसाईट आणि व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून ग्रुप ऑफ ब्लड कनेक्टींगचा विस्तार सुरु आहे. लवकरच एपच्या माध्यमातून हे नेटवर्क वाढवण्यात येणार आहे. हेल्पलाईन तर २४ तास सुरु असते. पण आता एपच्या माध्यमातून थेट रक्तदात्याला संपर्क करण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपल्याला यासाठी नोंदणी करायची असल्यास 9506060074 या क्रमांकावर संपर्क करु शकता. शिवाय रक्तदान शिबीर आणि कॅम्पच्या माध्यमातूनही रक्ताचा मोठा साठा तयार करण्यात येत आहे.
अशाच प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :