‘हेपेटायटिस-सी’ आपलं काहीही बिघडवू शकत नाही..
गरज आहे ती सर्वांनी मिळून प्रयत्न करण्याची !
जगभरात झालेल्या अनेक सर्वेक्षणांमधून ही गोष्ट सहज लक्षात येऊ शकते की तब्बल २० कोटी लोकांना ‘हेपेटायटिस-सी’ची लागण झालीये. याचाच अर्थ असा की जगातली जवळपास३ टक्के लोकसंख्या या भयानक रोगाचा सामना करत आहे. कर्करोगासारख्या जीवघेण्या रोगाच्या सावटाखाली जगतेय. दरवर्षी ३० ते ४० लाख लोकांना ‘हॅपेटायटिस-सी’ची लागण होते आणि त्यापैकी जवळपास साडेतीन लाख रूग्ण या भयानक रोगामुळे आपला जीव गमावतात. इतकेच रूग्ण सायरोसिसमुळेही दगावतात.

'हेपेटायटिस-सी'वर मात शक्य आहे...
‘हेपेटायटिस-सी’मुळे एकट्या २०१० या वर्षभरात तब्बल १६ हजार भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. जवळपास २ लाख भारतीयांचा यकृताच्या कर्करोगामुळे मृत्यू झाला, ज्याला कारणीभूत ठरतो ‘हेपेटायटिस-सी’चा विषाणू. सध्या आपल्या देशात अंदाजे १ कोटींपेक्षा जास्त भारतीयांना हेपेटायटिस-सी’ विषाणूची लागण झालेली आहे. आणि धक्कादायक बाब म्हणजे हे फक्त अंदाजे आकडे आहेत. वास्तवात याहून अधिक भारतीयांना या भयानक विषाणूची लागण झालेली असू शकते. आरोग्यविषयक मूलभूत सुविधांच्या कमतरतेमुळे यातल्या बहुतेक भारतीयांना हेपेटायटिस-सी’ची आपल्याला लागण झालीये, याविषयी कदाचित माहितीही नसेल.
‘हेपेटायटिस-सी’ या विषाणूचा शोध १९८९ मध्ये लागला. आणि तेव्हापासून आत्तापर्यंत या आजारानं कित्येकांचे जीव घेतलेत. आत्तापर्यंत या विषाणूवर कोणताही उपाय किंवा औषध शास्त्रज्ञांना सापडलेलं नाही. पण टाईम्स ऑफ इंडियाच्या मते यावर्षी मे महिन्यात दिल्लीमधल्या ‘सर गंगाराम हॉस्पिटल’मधल्या डॉक्टरांच्या एका टीमने एक असं औषध शोधून काढलंय, जे हेपेटायटिस-सी’ची लागण झालेल्या ९० टक्के रूग्णांवर परिणामकारक सिद्ध झालंय. याआधी ज्या औषधावर डॉक्टर अवलंबून होते, ते रीबावायरिन फक्त १४ टक्के रूग्णांवरच उपचार करण्यासाठी समर्थ होतं.

...तर लाखो भारतीयांची ‘हेपेटायटिस-सी’पासून सुटका करता येऊ शकेल !
भारतीय डॉक्टरांच्या मते एचआयव्ही एड्सविरोधात लढण्यासाठी भारतात आरोग्यविषयक सेवांमध्ये एक चांगली मूलभूत आणि अत्याधुनिक तंत्रप्रणाली विकसित झालेली आहे. त्याच प्रणालीचा वापर करून आपण ‘हेपेटायटिस-सी’विरोधात एक मोहीम सुरु करू शकतो. या उपलब्ध साधनसामुग्रीचा वापर करून ‘हेपेटायटिस-सी’चा सामना करणं शक्य आहे. जर रूग्णालयांमध्ये ‘हेपेटायटिस-सी’ची चाचणी बंधनकारक केली गेली, तर वेळीच उपचार आणि काळजी घेऊन अनेक रूग्णांचा जीव वाचवणं शक्य आहे.
हे उघडच आहे की आपल्या देशात एचआयव्ही एड्सच्या तुलनेत ‘हेपेटायटिस-सी’ची लागण झालेल्यांची आणि त्यामुळे मृत्यू होणा-यांची संख्या खूप जास्त आहे. पण ब-याच वेळा अनेक रूग्णांना या दोन्ही विषाणूंची लागण झाल्याचं पहायला मिळतं. ‘हेपेटायटिस-सी’च्या विषाणूसाठी करावी लागणारी चाचणी महाग असते, आणि बहुतेक भारतीयांना हा खर्च न परवडणारा असतो.
‘हेपेटायटिस-सी’च्या विषाणूप्रमाणेच भारतासमोर याच रोगाशी संबंधित आणखी एक भयानक समस्या आहे. आणि ती म्हणजे, आपण अजूनही या विषाणूचं, रोगाचं गांभीर्य, त्याचा आवाका समजू शकलेलो नाही. म्हणजे नक्की कोणकोणत्या भागांमध्ये हा विषाणू अधिक आढळतो, भारतीय हवामान आणि परिस्थितीमध्ये या विषाणूच्या संसर्गावर, त्याच्या फैलावावर कसा अंकुश ठेवता येईल याची आपल्यासमोर कोणतीही योजना नाही. या प्रश्नांची उत्तर आपल्याला माहितीच नाहीयेत. त्यामुळे जोपर्यंत अगदी छोट्या आणि मूलभूत पातळीवर आपण काम करायला सुरुवात करत नाही, तोपर्यंत या विषाणूवर आणि त्यामुळे होणा-या रोगावर आपण मात करू शकणार नाही.
‘हेपेटायटिस-सी’ या विषाणूविरोधातल्या लढ्यासाठी त्रिपुरातल्या ‘हेपेटायटिस फाऊंडेशन’चे प्रमुख डॉ. प्रदीप भौमिक यांनी गुवाहाटीमध्ये एका परिषदेसमोर मांडलेले विचार महत्त्वाचे आहेत. भौमिक म्हणतात, “विज्ञान क्षेत्रात अनेक नवीन संशोधनं झालेली आहेत. जर आपण सर्वांनी मिळून मेहनत केली, तर लाखो भारतीयांची ‘हेपेटायटिस-सी’पासून सुटका करता येऊ शकेल. गरज आहे ती शासन, संशोधक, औषध क्षेत्रातील बडे उद्योजक आणि अर्थात डॉक्टर या सर्वांनी पुढाकार घेण्याची.”