शेतकऱ्यांसाठी अनोखी चळवळ - लव दाय फार्मर
औरंगाबादचे मोसंबीचे शेतकरी शिवाजी गायकवाड यांनी फेसबुकवर आपली व्यथा मांडली होती. ही व्यथा मन विचलित करणारी होती. शेतात मर-मर काम करुन, रक्ताचं पाणी करुन, निसर्गाच्या सर्व लहरी कारभाराचा सामना करत मोसंबी पिकवायची. पण हातात किलो मागे फक्त १५ रुपये टेकवले जातात. मग शेतकी व्यवसायात रहायचं की नाही असाच एक प्रश्न उभा राहतो. अशी ही पोस्ट खरं तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची कर्मकहाणी सांगत होती. एका आंतरराष्ट्रीय कंपनीत बिजनेस मॅनेजर म्हणून काम करणारे रणजित पवार हे ही पोस्ट वाचून फार अस्वस्थ झाले. ते शिवाजी गायकवाडांना ओळखत होते. स्वतः शेतकरी कुटुंबातल्या रणजित यांना शिवाजींसारख्या शेतकऱ्यांच्या व्यथा माहीत होत्या. पण त्यांच्यासाठी काही करता येत नव्हतं याचं ही वाईट वाटत होतं. यावेळी शिवाजींना मदत करण्याचं त्यांनी मनावर घेतलं. मग जर्मनीतल्या एका मित्राच्या मदतीनं त्यांनी तातडीनं एक फेसबुक पेज तयार केलं ‘लव दाय फार्मर’ . हे पेज तयार करण्याचा उद्देश हाच होता की शिवाजींना आपल्या मोसंबीसाठी जास्तीत जास्त थेट ग्राहक मिळावेत आणि त्यांना त्याचा फायदा मिळावा. ६ सप्टेंबर २०१५ रोजी सुरु झालेल्या या फेसबुक पेजनं चळवळीचं रुप धारण केलं आणि शिवाजींचा मोबाईल ऑर्डरसाठी सतत खणखणू लागला.

आपला देश हा शेतीप्रधान देश आहे, हे शाळेत असल्यापासून ऐकत आलो होतो पण त्याच शेतकऱ्याची अवस्था दिवसेंदिवस वाईट होत जातेय. ई-कॉमर्सनं जग बदललं असलं, एका क्लीकवर जगातली कुठलीही वस्तू घरपोच मिळत असली तरी शेतकरी मात्र या सेवेपासून तसा दूरच आहे. अशावेळी शिवाजींना याच ई-कॉमर्सचा वापर करुन जास्तीत जास्त मोसंबी विकण्यासाठी हे मदत कार्य सुरु केले . ७ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे शहरातून मोसंबींची ऑर्डर इतकी वाढली की फेसबुकचं पेज त्यासाठी पुरं पडणार नव्हतं. यातूनच www.luvthyfarmer.com ही वेबसाईट तयार करण्यात आली. इथं ऑनलाईन मोसंबीची ऑर्डर देता येणार होती. हे अगदी सोपं होणार होतं. शेतकऱ्यांना फायदा मिळावा या ध्यासानं झपाटलेले खारघरचे प्रोफेसर कुरुष दलाल, प्रभादेवीच्या अनुराधा पवार आणि ठाण्याच्या वरुणा राव आणि चेम्बुरच्या वैशाली नारकर यांनी पिक-अप पॉईंटसाठी आपले दरवाजे २४ तास उघडे केले.

लव दाय फार्मर डॉट कॉम या वेबसाईटवर कमीत कमी ५ किलो मोसंबीची ऑर्डर देण्याची सोय आहे. हे ५ किलो मोसंबी फक्त 300 रुपयांला मिळतायत. ऑर्डर आल्यावर नजिकच्या पिक-अप पॉईंटवरुन ती घायची आणि आता सर्वात महत्वाचं म्हणजे मोसंबी ज्युस एन्जॉय करत असल्याचा फोटो फेसबुकवर पोस्ट करायचा. याला 'वन ग्लास मोसंबी चॅलेन्ज' असं नाव देण्यात आलं. याचा परिणाम असा झाला की एका महिन्यात ५ टन मोसंबी विकली गेली. हा एक रेकॉर्ड म्हणावा लागेल आणि लव दाय फार्मर या अनोख्या चळवळीचं प्रचंड यश म्हणावं लागेल.

६० रुपये प्रति किलो मोसंबी मागे २० रुपये ट्रान्सपोर्टसाठी जातात आणि शिवाजी गायकवाड यांना प्रतिकिलो ३० ते ४० रुपये मिळतात. याचा अर्थ असा की अगोदर जे फक्त १५ रुपये मिळायचे ते आता दुप्पटीपेक्षा जास्त पैसे त्याच्या हाती येतायत. या यशानंतर आता शिवाजींसारख्या अनेक शेतकऱ्यांनी रणजित पवारकडे विचारणा केलीय. मोसंबी प्रमाणेच नागपूरची संत्र, आंबा, स्ट्रॉबेरी, डाळींब, केळी आणि तांदळाचे उत्पन्न घेणारे शेतकरी याचप्रकारे आपलं पिक थेट ग्राहकांपर्यंत पोचवता येईल का याची चाचपणी करतायत. लव दाय फार्मर ही चळवळ आता वाढणार हे निश्चित.