एका ड्रायव्हरचा इंजिनिअर मुलगा ‘जिज्ञासा’ मार्फत देत आहे गरीब मुलांना शिक्षणाची उत्तम संधी
आर्थिक अडचणीमुळे ज्या व्यक्तीने आपले शालेय शिक्षण मोठ्या कठीण परिस्थितीत पूर्ण केले तो आज इंजिनिअरिंगचा अभ्यास करत आहे. आपल्या मित्रांचे वर्ष वाया न जाण्यासाठी त्यांना शिकवण्याचे काम सुरु केले. हा परिपाठ सातत्याने सुरु होता व आता शेकडो शाळेतील मुलांना ते मोफत शिकवण्याचे काम आपली संस्था ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ मार्फत करीत आहे. अजीज-उर-रहमान बिहारच्या गया जिल्यातील हमजापूर गावातील रहिवासी आहेत. त्यांचे वडिल पेशाने वाहन चालक आहे. रहमान अभ्यासात पहिल्यापासूनच हुशार होते. त्यांचे नववी-दहावीचे गुण चांगले असल्यामुळे त्यांच्या वडिलांनी व दोन मोठ्या भावांनी त्यांना पुढच्या शिक्षणासाठी पटना येथे पाठवले. १२वी नंतर त्यांची निवड इंजिनिअरिंगसाठी पुण्याच्या एमआईटी कॉलेज मध्ये झाली. अजीज रहमान यांना पुण्यातील आपल्या इंजिनिअरिंगच्या अभ्यासादरम्यान जाणवले की कोणत्याही विद्यार्थ्याचा एखादा विषय कच्चा असेल तर त्यांचे पूर्ण वर्ष वाया जाते. रहमान यांचा गणित हा विषय पक्का होता, म्हणूनच जे गणितात कच्चे होते अश्या मुलांना पहिल्या व दुसऱ्या वर्षापर्यंत त्यांनी शिकवण्याचे काम सुरु केले.

काळानुसार अजीज रहमान यांना जाणवले की ते चांगले शिकवत आहे. हीच गोष्ट कॉलेज प्रशासनाला पण कळली परिणाम हा झाला की त्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची अनुमती मिळाली. यादरम्यान आपल्या शिक्षणाबरोबर इतरांना शिकवण्याचे काम सुरु झाले. हळूहळू त्यांच्या मनात विचार आला की आपल्या या कामाचा विस्तार करून शाळेतील मुलांना पण शिक्षित करावे. रहमान हे गरीब कुटुंबातून आल्यामुळे त्यांना माहित होते की गरीब मुलांमध्ये योग्यता असूनही काही आर्थिक अडचणींमुळे ते पुढे जावू शकत नाही तेव्हा त्यांनी अश्या गरीब मुलांना शिकवण्याचा निर्धार केला. रहमान सांगतात की,’’सगळे मुलं माझ्यासारखे नशीबवान नसतात जर मला माझ्या दोन मोठ्या भावांचा सहयोग मिळाला नसता तर आज मी इंजिनिअरिंग करत नसतो.”

याप्रकारे रहमान यांनी स्वतः एका सरकारी शाळेत जावून तेथील प्राचार्यांना भेटून मुलांना संगणक शिकवण्याची आपली इच्छा दर्शवली, कल्पना आवडल्या मुळे प्राचार्यांनी त्यांना याची अनुमती दिली. एकट्याने छोट्या मुलांना शिकवणे त्यांना जरा कठीण वाटत होते म्हणून त्यांनी अश्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मदतीला घेतले ज्यांना पूर्वी त्यांनी शिकवले होते.

यानंतर अजीज-उर-रहमान यांनी सन २०१४ मध्ये ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ ची स्थापना केली. या ट्रस्टचा उद्देश गरीब व स्लम भागात रहाणाऱ्या योग्य मुलांना शिक्षणासाठी मदत करण्याचा आहे. जेणेकरून ते भविष्यात चांगले डॉक्टर, इंजिनिअर बनू शकतील. सुरवातीला त्यांनी पुण्यापासून २५ किमी दूर आळंदी गावातील २ शाळा व कल्याण गावातील एका शाळेची निवड केली. इथे ते व त्यांची टीम पहिली ते सातवी पर्यंतच्या मुलांना शनिवार व रविवारी गणित, इंग्रजी व संगणक शिकवतात. यामध्ये या विषयांचे पुस्तक व स्वाध्यायमाला हे आपल्या तर्फे मुलांना मोफत उपलब्ध करवतात.

हळूहळू कॉलेजच्या सगळ्या विद्यार्थ्यांना कळून चुकले की रहमान ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ नामक संस्था चालवत आहे. आपल्या या कामाच्या विस्तारासाठी त्यांनी कॉलेजच्या ४८ मुलांची या कामासाठी निवड केली. या निवडलेल्या विद्यार्थ्यांना त्यांनी कॉलेजच्या आवारात मुलांना शिकवण्याचे प्रशिक्षण दिले. अशाप्रकारे एमआईटी कॉलेजचे दरवर्षी नवीन विद्यार्थी या कामात सहभागी होतात. आज या ट्रस्ट ला एमआईटी व दुसऱ्या कॉलेजचे ९२ विद्यार्थी जोडले असून ते सगळे इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत. ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ गरीब अनाथ व विकलांग मुलांना मोफत संगणक, गणित व इंग्रजी शिकवतात. रहमान यांना त्यांच्या ट्रस्ट च्या कामाचा विस्तार पुण्याव्यतिरिक्त इतर शहरांमध्ये करण्याचा आहे. ज्यामुळे इतर गरीब मुलांना याचा फायदा होईल. रहमान यांच्याच प्रयत्नांचा परिणाम आहे की आज आळंदी गावात ४० मुलांसाठी त्यांनी एक विशेष प्रशिक्षण केंद्र सुरु केले आहे ज्याचे वर्ग आठवड्यातील सातही दिवस संध्याकळी ५ ते ७ वाजेपर्यंत चालतात. यात अभ्यासादरम्यान येणाऱ्या मुलांच्या अडचणी सोडवल्या जातात व जे मुल शाळेत जात नाही किंवा काही कारणांनी शाळा सोडली अश्या मुलांना शाळेत पुन्हा भरती करतात.

यांची टीम आठवड्यातील एक दिवस विकलांग मुलांना व एक दिवस इतर मुलांना शिकवतात. अभ्यास व्यतिरिक्त हे लोक मुलांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना समूह चर्चा, वाद-विवाद स्पर्धा, सामान्यज्ञानाबरोबरच खेळण्याचे पण प्रशिक्षण देतात. तसेच रहमान यांच्या या कामात त्यांना इतर तीन कॉलेजचा पण सहयोग आहे. नुकतेच त्यांनी पुण्याच्या गर्ल्स इंजिनिअरिंग कॉलेजला पण आपल्या या कामात सहभागी केले आहे.

रहमान यांना वाटते की जास्तीत जास्त तरुण वर्गाने या कामात सहयोग केला पाहिजे कारण एकटा मनुष्य काही करू शकत नाही. रहमान यांचे काम स्वतःची बचत व मित्रांकडून मिळालेल्या आर्थिक मदतीवर चालते. यासाठी ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ चे १० ट्रस्टी तसेच ज्या २५ सदस्यांचा या कार्यात सहभाग आहे ज्यांना वार्षिक १ हजार रुपये देणे बंधनकारक आहे. याशिवाय रहमान यांना इतर विद्यार्थ्यांना शिकवून जी कमाई मिळते त्यातील काही हिस्सा ते या कामासाठी देतात. आपल्या भविष्यातील योजनेबद्दल ते सांगतात की, नोकरीकरून अनेक साथीदारांनी त्यांच्या या मोहिमेत सहभागी व्हावे जेणेकरून ‘जिज्ञासा एज्युकेशनल ट्रस्ट’ च्या मार्फत जास्तीत जास्त मुलांना चांगले शिक्षण मिळू शकेल.
यासारख्या आणखी काही प्रेरणादायी कहाण्या वाचण्यासाठी आमच्या YourStory MarathiFacebook पेजला भेट द्या. लाईक करा
आता वाचा संबंधित कहाण्या :
‘मुली शिकल्या तर समाजाची प्रगती होईल’ या विचारांना सत्यात परिवर्तीत करणारे धीरेंद्र
जुनून...वंचितांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचा
शैक्षणिक क्षेत्रात क्रांती घडवण्याकरता सात आकडी पगाराकडे पाठ फिरवणारा अवलिया
लेखिका – गीता बिश्त
अनुवाद – किरण ठाकरे