आयटी प्रोफेशनल ते युवक बिरादरीचं संचालक पद; ‘करिअरमे ट्विस्ट’
पुणे, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव,धुळे तर महाराष्ट्राबाहेर ग्वाल्हेर, कानपूर, राजकोट, इटावा अशी सतत भ्रमंती करणाऱ्या लीना शेटेला दिवसाचे चोवीस तासही अपुरे पडतात. इतकं काम आणि तेही सगळं आवडीचं असेल तर आणखी काय हवं ? सततचे दौरे, दगदग आणि अपुरी झोप असा त्रागा तिच्या बोलण्यात कुठेही जाणवत नाही. युवक बिरादरी या संस्थेचं डिरेक्टरपद समर्थपणे सांभाळणाऱ्या लीना शेटेला भेटलं की कामाचं समाधान आणि आनंद तिच्या डोळ्यात दिसतो.
युवक बिरादरीच्या बॅलेमधली एक आर्टिस्ट म्हणून हा प्रवास सुरु झाला. आज संस्थेचं डिरेक्टरपद सांभाऴताना गेल्या दहा-बारा वर्षांचा काळ आठवतो. नृत्याची आवड असल्यानं वयाच्या पाचव्या वर्षापासूनच मी दुर्गा झाली गौरी या बॅलेमध्ये काम करत होते. लोकनृत्याची आवड होतीच. मुंबईतल्या पोद्दार कॉलेजमधून कॉमर्सचं शिक्षण पूर्ण केल्यावर MCA केलं, मग आयटीतली नोकरी. कॉर्पोरेट लाईफ स्टाईल, शनिवार-रविवार सुट्टी, मोठ्ठा पगार, नवरादेखील आयटीतलाच. लग्नानंतर पुण्याला शिफ्ट झाले. असं सेट लाईफ होतं. मध्येमध्ये डान्स परफॉर्मन्स चालू होतेच. सिनिअर वेब प्रोग्रॅमर म्हणून काम चालू होतं. अचानक वाटायला लागलं की या व्हर्च्युअल जगात वावरताना खऱ्याखुऱ्या माणसांमधला संवाद हरवतोय. आयटीतलं काम नेहमीच एन्जॉय केलं पण माझं कॅलिबर यापेक्षा अधिक आहे. काहीतरी वेगळं करण्याचा शोध सुरु झाला आणि युवक बिरादरीनं ती संधी दिली. आजवर अनेक कार्यक्रमात भाग घेतला होता. कोरीओग्राफी केली होती. अनेक शोज् ही केले. पण ही जबाबदारी वेगळी आहे. एखाद्या कार्यक्रमाचं नियोजन, बजेट, सादरीकरण, क्राऊड मॅनेजमेंट...ही सगळी कामं करताना वेगळ्या स्कील्स् ची गरज लागते. आयटीतल्या कामापेक्षा अगदीचं भिन्न.
१९७४ मध्ये क्रांती शहा यांनी सुरु केलेली ही चऴवळ आज संपूर्ण भारतात चांगलीच फोफावलीय. सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक प्रबोधनाचा वसा घेतलेली युवक बिरादरी ही संस्था खऱ्या अर्थानं भारतातल्या युवा पिढीवर संस्कार करण्याचं काम मनोभावे करतेय. ‘पुण्यतीर्थ भारत’, ‘एक सुर एक ताल’, ‘वसुंधरा बचाव’ असे युवक बिरादरीचे नावाजलेले नृत्य कार्य़क्रम आणि विविध गाणी. गेली तीस वर्ष हे कार्य़क्रम चालू आहेत. ‘पुण्यतीर्थ भारत’ या आमच्या बॅलेमध्ये मी भारतमातेची भूमिका साकारते. गेली दहा वर्ष मी हा रोल करतेय. बदल हे रातोरात घडत नसतात. ती एक प्रोसेस आहे. युवक बिरादरीच्या गाण्यांमार्फत आम्हाला एक चांगला समाज आणि सशक्त भारत घडवायचा आहे. त्यासाठी लहान मुलांवर योग्य संस्कार होणं गरजेचं आहे. आम्ही बोईसरला एक कार्य़क्रम केला होता. त्यात जवळपास पाच हजार मुलं सहभागी झाली होती. आम्ही सगळ्यांनी मिळून गाणी म्हटली, हातवारे आणि अभिनयातून या गाण्यांमधली उर्जा प्रत्येकाच्या मनामनात पोहोचली. आज युवक बिरादरीची अनेक गाणी अनेक शाळांशाळातून प्रार्थनेच्या जोडीनं म्हटली जातात. “इतनी शक्ती हमें दे न दाता” हे अंकुश चित्रपटातलं गाजलेलं गाणं युवक बिरादरीचं आहे. आजची मुलं खुप हुषार आहेत. त्यांचं ग्रास्पिंग वाढलयं. त्यामुळे चांगलं,सकस आणि काळाच्या ओघात टिकेलं असं ज्ञान, संस्कार देणं हे आपली जबाबदारी आहे. कारण आजची ही लहान मुलंच उद्याचा भारत असणारे.
या मुलांबरोबर, आमच्या कार्यकर्त्यांबरोबर काम करताना एक वेगळीच उर्जा सतत जाणवत असते. आय़टीतल्या नोकरीतलं एसी ऑफिस इथे नाही. कार्यक्रमाच्या ठिकाणी रहाण्याची घरगुती सोय असते. कधी कच्च्या बांधकाम केलेल्या शाऴांमध्ये आम्ही कार्य़क्रम घेतो. एखाद्या कार्यकर्त्यांच्या घरी जेवतो. मैलनं मैल प्रवास करतो. वेगळे प्रदेश, वेगळी माती, नवी माणसं, जेवणाच्या विविध तऱ्हा असा समृद्ध करणारा अनुभव मिळतो. भारतभर फिरणं होतं. हे सगळं दमवून टाकणारं आहे. पण यातून मिळणारं समाधान आणि उर्जा मोठी आहे. युवक बिरादरीच्या माध्यमातून खरा भारत पहायला मिळाला. आता आम्हाला भारतातील पूर्वेकडील राज्यांमध्ये जाऊन काम करायचय. आसाम,अरुणाचल प्रदेश, मणिपूर, मिझोरम,मेघालय, नागालॅन्ड आणि त्रिपुरा या सेव्हन सिस्टर्सकडे आपण कायमच दुर्लक्ष केलं. निसर्ग आणि संस्कृतीचा समृद्ध वारसा जपणारी ही सातही राज्य आम्हाला युवक बिरादरीच्या माध्यमातून उरलेल्या भारताशी जोडून घ्यायची आहेत. गेली सहा वर्ष या पदाची जबाबदारी सांभाळताना अनेक अनुभव आले. आयटीचं बोटं मी अजून सोडलं नाहीये. ते काम सांभाळून युवक बिरादरीची घोडदौड सुरु आहे.