कौटुंबिक जबाबदारी आणि शिकण्याचीही इच्छा.. तरूणांच्या यक्षप्रश्नावर ‘फाईव्ह स्प्लॅश’चं उत्तर
उदयपूरपासून ८० किलोमीटर आत एका छोट्याशा गावात रहाणारे लखन जोशी ग्रामीण भागातल्या तरूणांनी शहरांमध्ये जाऊ नये यासाठी प्रयत्न करतायत..ज्या तरूणांना शिकण्याची इच्छा असते, मात्र कुटुंबाची जबाबदारीही खांद्यांवर असते, अशा तरूणांना ते रोजगार पुरवतात..सध्या उदयपूर, जोधपूर आणि अजमेरमध्ये प्रामुख्याने त्यांचं हे काम सुरु आहे..मात्र लवकरच देशातल्या१५ शहरांमध्ये हा उपक्रम नेण्याचा त्यांचा मानस आहे.
लखन जोशी मुळातले राजस्थानातल्या उदयपूर या ऐतिहासिक शहरापासून ८० किलोमीटर आत एका छोट्याशा गावात राहतात. १२ वीची परीक्षा पास झाल्यानंतर पुढचं शिक्षण पूर्ण करण्याची त्यांची इच्छा होती. मात्र त्याचबरोबर त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारीही होती. त्यांनी त्यांच्या करिअरची सुरुवात एक ‘टीम मॅनेजर’ म्हणून केली. आणि आज उदयपूरमधली आयटी कंपनी ‘फाईव्ह स्प्लॅश’चे ते संचालक आहेत. आणि ही कंपनी त्यांची स्वप्नं सत्यात उतरवण्याचं काम करते. आणि हे स्वप्न आहे शिकण्याची इच्छा असणा-या तरूणांना रोजगार पुरवण्याचं. लखन जोशी यांनी स्वत: ‘फाईव्ह स्प्लॅश’मध्ये काम करतानाच उच्च शिक्षण पूर्ण केलं. ‘फाईव्ह स्प्लॅश’मध्ये येणारे ते पाचवे कर्मचारी होते.
‘फाईव्ह स्प्लॅश’मध्ये सर्वप्रथम येणारे तरूण औदिच्य यांनी काही काळ ही कंपनी सोडली होती. काही नामांकित मोठ्या कंपन्यांमध्ये त्यांनी काम केलं. पण त्यांना तिथे गेल्यानंतर ‘फाईव्ह स्प्लॅश’चं वेगळेपण प्रकर्षानं जाणवलं. विशेषत: ‘फाईव्ह स्प्लॅश’मधले झोकून देऊन काम करणारे सहकर्मचारी. आज ते पुन्हा एकदा ‘फाईव्ह स्प्लॅश’शी जोडले गेले आहेत. आणि कंपनीच्या ‘एण्ड टु एण्ड सोल्यूशन्स’ शाखेची जबाबदारी त्यांच्यावर आहे.
कंपनीची सुरुवात...
‘फाईव्ह स्प्लॅश’ची स्थापना २००९ मध्ये कपिल शर्मा यांनी केली होती. कपिल शर्मा यांनी ‘विश्वेश्वरय्या टेक्निकल युनिवर्सिटी’ अर्थात ‘वीटीयु’तून इलेक्ट्रॉनिक्समध्ये पदवीचा अभ्यासक्रम पूर्ण केला. वास्तविक पहाता त्या वयात फिरायला जाणं, धमाल-मस्ती करणं, मोठ्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी करणं असेच पर्याय इतर इंजिनियर तरूणांकडून स्वीकारले जातात. कपिल शर्मांना मात्र नेहमीच त्यांच्या गावी म्हणजेच उदयपूरला परत येऊन तिथे काहीतरी करायचं होतं. आणि उदयपूरमध्ये असं काहीतरी करण्यासाठी त्यांच्या सोबतीला होती एक मुलगी, जिला त्यांच्यासोबत काम करायची इच्छा होती. तिच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी कपिल शर्मा यांच्या कुटुंबानं घेतली होती.

कपिल शर्मा..'फाईव्ह स्प्लॅश'चे बॅकबोन...
“तिला आमच्याकडून सहानुभूती किंवा पैसे नको होते. शिवाय आम्ही केलेल्या मदतीच्या बदल्यात तिला काहीतरी काम करायचं होतं”, कपिल सांगतात,“ त्याचवेळी आम्हाला जाणवलं की अशा तरूणांकडे आर्थिक पाठबळ नसेल पण ते प्रचंड महत्त्वाकांक्षी असतात, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात प्रचंड आत्मसन्मान असतो. त्यातूनच या तरूणांसाठी काहीतरी करण्याचा आम्ही निर्णय घेतला.”

रोजगार आणि शिक्षण एकाच छत्राखाली..
‘फाईव्ह स्प्लॅश’च्या सुरुवातीविषयीही कपिल सांगतात. “२००८ मध्ये एका मित्रासोबत चहा घेत असताना ही कल्पना सुचली. माझा तो मित्र बीपीओ क्षेत्रात काम करत होता. त्यानं त्याचे अनुभव सांगतानाच हेही सांगितलं की या नव्या आयटी क्षेत्रात रोजगाराच्या अनेक नवनव्या संधी उपलब्ध आहेत. विशेषत: तरूणांसाठी. आम्हाला वाटलं की जर या क्षेत्रात इतक्या संधी आहेत, तर मग उदयपूरमधल्या तरूणांना यातून सहज रोजगार मिळू शकेल !”
शहरांकडे जाणारा तरूण थांबायला हवा...
शहरीकरणाच्या दर्जानुसार दुस-या आणि तिस-या स्तरावरच्या शहरांमध्ये महागाईनं गंभीर रूप धारण केलं होतं. एकीकडे महागाई वेगानं वाढत होती, मात्र दुसरीकडे त्याच वेगानं या शहरांमध्ये नोक-या/रोजगार उपलब्ध होऊ शकत नव्हता. आणि याच रोजगाराच्या शोधात या ठिकाणची तरूणाई मोठ्या शहरांकडे स्थलांतर करत होती. यातल्या काहींना नक्कीच यश मिळत होतं, मात्र बहुतेकांच्या हाती निराशाच येत होती.

तंत्रज्ञान प्रशिक्षण आणि सेवा...
या शहरांसाठी एक महत्त्वाची बाब कपिल शर्मा सांगतात. “या परिस्थितीत आपण कोणत्याच समस्येवर उपाय शोधत नाही आणि परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत आहे. त्याऐवजी आम्ही या दुस-या आणि तिस-या दर्जाच्या शहरांमध्ये रहाणा-या ६० ते ६५ टक्के भारतीयांसाठी काम करतोय. त्यांच्यातल्या प्रतिभेला लोकांसमोर आणण्याचा, तिला योग्य दिशा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. या लोकांमध्ये विलक्षण अशी शिकण्याची, समजून घेण्याची शक्ती आहे. आपण जर खरंच प्रयत्न केले, तर ही लोकं चमत्कार घडवून आणू शकतात. सध्या रोजगाराच्या अधिकांश संधी या देशातल्या १५ ते २० टक्के मोठ्या शहरांमध्येच केंद्रीत झालेल्या आहेत. छोट्या शहरांमधून मोठ्या शहरांकडे होणा-या रोजगारासाठीच्या स्थलांतरामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यामुळे छोटी शहरं आणि ग्रामीण युवकांकडे जर आपण लक्ष दिलं, तर ब-याच अडचणींवर आपण मात करू शकू. हे तरूण मोठ्या शहरांमधल्या तरूणांच्या बरोबरीने काम करू शकतील. ‘फाईव्ह स्प्लॅश’सोबत जोडलेले जवळपास ३० टक्के लोकं हे ग्रामीण भागातून आलेले आहेत. यातले अनेकजण ऑफिसजवळच भाड्याच्या खोल्यामध्येही रहात आहेत.”
कपिल नेहमीच नोकरीमध्ये गरजू लोकांना अधिकाधिक प्राधान्य देतात. ते पुढे सांगतात, “आम्ही ग्रामीण पार्श्वभूमी असलेल्या अशा तरूणांना नोकरीवर ठेवतो, ज्यांना त्यांच्या पुढच्या शिक्षणासाठी आर्थिक मदतीची गरज असते. हे तरूण दिवसरात्र काम करतात आणि त्यासोबतच त्यांचं शिक्षणही पूर्ण करतात. याशिवाय आम्ही विधवा स्त्रिया, गृहिणी आणि घरातल्या एकुलत्या एक कमावत्या मुलींना रोजगार उपलब्ध करून त्या माध्यमातून महिलांना सशक्त करण्याचाही प्रयत्न करत आहोत. आणि आम्ही अशा अपंग व्यक्तींनाही रोजगाराच्या संधी देतो, ज्यांना त्यांच्या अपंगत्वावर मात करून स्वावलंबी व्हायचंय, स्वत:च्या हिंमतीवर नवी उभारी घ्यायचीय.”
प्रशिक्षणाची विशेष पद्धत
कुणालाही ‘फाईव्ह स्प्लॅश’सोबत काम करायचं असल्यास, काही चाचण्या उत्तीर्ण व्हाव्या लागतात. कपिल सांगतात, “सर्वात आधी आम्ही समोरच्या व्यक्तीच्या आवाजाचा दर्जा आणि कम्प्युटर अर्थात संगणकाविषयीच्या ज्ञानाशी संबंधित काही चाचण्या घेतो. यामध्ये जर ती व्यक्ती पात्र ठरली, तर आम्ही त्या व्यक्तीला आमच्यासोबत आमच्या टीममध्ये सामील करून घेतो. मग त्यांना त्यांच्या पात्रतेनुसार, आवाक्यानुसार प्रशिक्षण दिलं जातं. यासाठी आम्ही काही ‘वॉईस’ (थेट ग्राहकांशी संपर्क) आणि ‘नॉन वॉईस’ (ऑफिस सपोर्ट) अशा प्रकारचे अभ्यासक्रमही तयार केले आहेत. या अभ्यासक्रमांच्या माध्यमातून आम्ही आधी त्या सर्वांना सामान्य आणि समान प्रशिक्षण देतो, आणि नंतर त्यांच्या गुणवत्तेनुसार, पात्रतेनुसार त्यांना विशेष कौशल्यासाठी प्रशिक्षित केलं जातं.” या सगळ्या खटाटोपाशिवाय ‘फाईव्ह स्प्लॅश’ ग्रामीण विकास मंत्रालयासोबत काम करणा-या एनजीओ (सामाजिक संस्था) आणि इतर अनेक संस्थांच्या माध्यमातूनही अधिकाधिक लोकांना या उपक्रमात सहभागी करून घेण्याचा प्रयत्न करते.

'फाईव्ह स्प्लॅश'ची टीम अजमेर...
कपिल शर्मांच्या मते आत्तापर्यंत त्यांना लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळालाय. ते म्हणतात, “या तरूणांचा विचार करताना आपल्याला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. ती म्हणजे, या तरूणांना अशा ठिकाणी काम करायला आवडतं जिथे अगदी घरासारखं वातावरण असेल. अशा प्रकारचं वातावरणच त्यांना संस्थेशी आणि एकमेकांशी कायम बांधून ठेऊ शकतं. आणि याच वातावरणामुळे संस्था सोडून इतरत्र कामासाठी जाणा-यांचं प्रमाण इथे खूपच कमी आहे.”
सेवा आणि कार्यपद्धती
‘फाईव्ह स्प्लॅश’ ही ‘नॅसकॉम’ या डेटा प्रोसेस (माहिती संकलन-प्रक्रिया) कंपनीची एक सह्योगी कंपनी आहे. उदयपूर, जोधपूर आणि अजमेर या तीन ठिकाणी प्रामुख्यानं कंपनीचं काम सुरु आहे. वेगवेगळ्या प्रकारच्या सेवा कंपनीकडून पुरवल्या जातात. या सेवांमध्ये डाटा एन्ट्री (माहिती संकलन), ओसीआर (ऑप्टिकल कॅरेक्टर रेकग्निशन डिजीटलायझेशन) अर्थात डिजीटल स्वरूपात माहितीचं संकलन, कागदपत्रांची सूसूत्र मांडणी (डॉक्युमेंट मॅनेजमेंट), कागदपत्रांचं स्कॅनिंग, डेटा मायनिंग (माहितीची सहज सोप्या आणि लक्षात राहील अशा स्वरूपात मांडणी करणं), विविध प्रकारच्या चलान(पावती)संबंधीच्या सेवा, क्लेम अँड रिबेट (पैशांची मागणी आणि त्याचा पुरवठा), ऑफिसमधल्या तंत्रज्ञानविषयक सेवा(बॅक ऑफिस सपोर्ट), ई-मेल आणि चॅटिंगसंबंधीच्या सेवा अशा अनेक प्रकारच्या कामांचा समावेश आहे. अर्थजगतातील इ-कॉमर्स, टेलिकॉम क्षेत्र, रिअल इस्टेट(जागांचे व्यवहार), रिटेल (घाऊक व्यवसाय), बँकिंग, विमा अशा विविध शाखांमध्ये या सेवा पुरवल्या जातात.

अनेक मोठमोठ्या कंपन्यांसाठी सेवा...
‘फाईव्ह स्प्लॅश’ ही एक पूर्णपणे खासगी कंपनी असून त्यासाठीची आर्थिक तरतूद ही पूर्णपणे शर्मा परिवाराकडून केली जाते. कपिल यांच्यामते आता ते या तीन शहरांसोबतच इतरही शहरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. कपिल म्हणतात, “आम्हाला सध्याच्या तीन शहरांपासून १५ शहरांपर्यंत आणि तिथल्या ३ हजार कुटुंबांपर्यंत कंपनीचा विस्तार करायचाय. यासाठी दक्षिण भारत, पूर्वेकडची आर्थिकदृष्ट्या मागास राज्य आणि काश्मीर या प्रदेशांची आम्ही निवड केलीये. येत्या तीन ते चार वर्षांमध्येच हे लक्ष्य आम्ही पूर्ण करू याची आम्हाला पूर्ण खात्री आहे.”
शेवटी कपिल शर्मा इतकंच सांगतात, “आम्हाला ‘फाईव्ह स्प्लॅश’ ही एक व्यापारी कंपनी बनवायची नाही. तर तिचं स्वरूप समाजासाठी प्रेरणादायी ठरावं अशी आमची इच्छा आहे. ‘फाईव्ह स्प्लॅश’पासून एका अशा विचाराची, कल्पनेची सुरुवात व्हावी की जिच्यातून भारतातल्या किमान ५०० शहरांमधल्या महत्त्वाकांक्षी तरूणाईला दिशा मिळेल. असं झालं, तर देशातल्या स्थलांतराच्या मोठ्या समस्येवर काहीतरी तोडगा निघण्याची शक्यता आहे. आम्ही एकट्याने ५०० शहरांमध्ये काम करू शकत नाही, सेवा देऊ शकत नाही. आमच्यासारख्याच इतरही आयटी कंपन्यांनी आमच्याप्रमाणेच विचार करावा, सामाजिक दृष्टीकोन ठेवावा आणि कामाला सुरुवात करावी असं आम्हाला वाटतं. खरंतर असा विचार इतर कंपन्यांनी केला तर ते या छोट्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात आमच्याप्रमाणेच, किंबहुना आमच्यापेक्षा चांगल्या पद्धतीने काम करू शकतात, सेवा देऊ शकतात. छोटी शहरं, ग्रामीण भारत आणि मोठी शहरं यांच्यातलं अंतर, मग ते जमिनीवरचं असो किंवा मग कौशल्य आणि प्रतिभेचं असो, या महत्त्वाकांक्षी आणि समाजोपयोगी कार्यात अडथळा ठरणार नाही.”