केंद्र सरकार आणि हॉटेल संघटनांच्या सहकार्याने दलित महिलांना मिळाले स्वयंरोजगाराचे साधन 'लोणचे उदयोग'
दि हॉटेल ऍण्ड रेस्टॉरेंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया (एचआरएडब्ल्यूआय) यांनी भारत सरकारच्या सामाजिक न्याय विभागासोबत सहभागिता करून दलित महिलांना त्यांचे स्वत:चे लघुद्योग सुरू करण्यास मदत केली आहे. आणि या सामाजिक उपक्रमासाठी नित्योपयोगी अन्न पदार्थ तयार करण्याच्या प्रकल्पांची निवड करून सुरूवात करण्यात आली आहे. त्यात प्रामुख्याने लोणचे उद्योगाचा समावेश होतो.
हॉटेल संघटनेने याचा दुहेरी फायदा करून घेत त्यांच्या हॉटेलशी संबंधित सदस्यांना या उदयोगात सहभागी करून घेत सदस्य हॉटेलांनाच त्यांचे हे उत्पादन खरेदी करण्याची शिफारस केली आहे. दलित महिलांच्या बचत गटामार्फत हे लोणचे तयार केले जाते.

“ सुमारे दहा हजारपेक्षा जास्त हॉटेल आणि उपहारगृहे मुंबईत आहेत, त्यातून किमान लोणचे प्रकल्पामुळे ६.५ लाख मागास घटकातील महिलांना रोजगाराची संधी मिळणार आहे. असा अंदाज आहे की, देशात स्थानिक हॉटेलमध्ये वर्षाला २४० कोटी रूपयांचे लोणचे विकत घेतले जाते. त्यात हॉटेल व्यवसायाचा वाटा सुमारे ६५ ते७० कोटी रूपयांचा आहे. एका महिन्याला किमान तीन ते पाच हॉटेलांना लोणच्याचा पुरवठा केला तरी दहा महिलांना रोजगार मिळू शकतो”असे भारत मलकानी हॉटेल संघटनेचे माजी अध्यक्ष यांनी सांगितले.
हा प्रकल्प परिषद घेवून चर्चा करून जाहीर करण्यात आला, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि महिला आणि बालकल्याण तसेच केद्रीय समाजकल्याण मंत्रालय भारत सरकार यांनी यात पुढाकार घेतला होता. यावेळी दलित महिलांसमोरच्या आव्हानांचा आढावा घेण्यात आला आणि त्यांना मार्ग देण्यासाठी कोणत्या उपाययोजना करण्यात याव्या याची चर्चा करण्यात आली. योगायोगाने या मेळाव्याला केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री रामदास आठवले हे देखील हजर होते. या शिवाय हॉटेल संघटनेचे भारत मलकानी आणि निर्मला निकेतनच्या प्राचार्या डॉ गिता इब्राहिम उपस्थित होत्या. यावेळी बोलताना मंत्री आठवले म्हणाले की, “ मी हॉटेल संघटनेचा आभारी आहे की त्यांनी या उपक्रमात भाग घेतला, त्यातून समाजातील वंचित घटकांना न्याय देण्याच्या कामी मोठी मदत होणार असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेले प्रत्येक माणसाच्या योग्य समान मुल्यांकनाचे तत्व जोपासले जाणार आहे. त्यातून सामाजिक आर्थिक स्थैर्य आणि समानता या डॉ आंबेडकर यांच्या मार्गाने जाता येणार आहे. त्यानी या प्रसंगी उपस्थित असलेल्या इंडो-अमेरिकन चेंबर्स ऑफ कॉमर्स च्या प्रतिनिधीचे देखील आभार मानले.
“ जरी आम्ही हा प्रयोग महाराष्ट्रात सुरू केला असला तरी, हॉटेल व्यवसायासाठी हा पथदर्शी प्रकल्प असेल जो त्यातील त्रुटी समजावून घेत देशभरात राबविता येणार आहे. आदरातिथ्य क्षेत्रात देशाला प्रचंड रोजगाराची साधने देण्याची शक्ती आहे, त्यातून देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात देखील मोलाची भर घालता येईल.” असे दिलीप दातवानी, विद्यमान अध्यक्ष हॉटेल ऍण्ड रेस्टॉरेंट असोसिएशन ऑफ वेस्टर्न इंडिया यांनी समारोप प्रसंगी सांगितले.